Home राष्ट्रीय जम्मू काश्मीर: अनंतनाग येथे ग्रेनेड हल्ल्यात १० जण जखमी

जम्मू काश्मीर: अनंतनाग येथे ग्रेनेड हल्ल्यात १० जण जखमी

0

भारत-पाकिस्तान मध्ये नेहमी वादाचा प्रश्न असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले झाल्याच्या बातम्या कायम येत असतात. आजही जम्मू काश्मीरमध्ये असाच एक हल्ला झाल्याची बातमी आली आहे. काश्मीरमधील अनंतनाग येथे आज अर्थात ५ ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी डीसी ऑफिसच्या बाहेर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर ग्रेनेड फेकून हल्ला केला. या हल्ल्यात १० जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

मीडिया न्यूजमधून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ११ वाजेच्या आसपास दहशतवाद्यांनी उपायुक्त कार्यालयाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर निशाणा साधून ग्रेनेडद्वारे हल्ला चढवला. या घटनेत जवळपास ८ ते १० जण जखमी झाले असून त्यात ४ नागरिक, एक पोलीस अधिकारी आणि एका पत्रकाराचाही समावेश असल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी दिली आहे. तसेच हल्ल्यानंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याचे काश्मीर पोलिसांनी केलेल्या ट्विटवरून समजले. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याला आज दोन महिने पूर्ण झाले असून याच कारणामुळे दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला असावा असे अंदाज वर्तविले जात आहेत.