Home राष्ट्रीय लखनऊमध्ये भर दिवसा हिंदू महासभेच्या नेत्याची अज्ञातांकडून हत्या

लखनऊमध्ये भर दिवसा हिंदू महासभेच्या नेत्याची अज्ञातांकडून हत्या

0

अयोध्या प्रकरणात राम जन्मभूमीची बाजू मांडणाऱ्या हिंदू महासभेच्या एका नेत्याची भरदिवसा हत्या झाली असल्याचे नुकत्याच आलेल्या वृत्तावरून समजले. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील कमलेश तिवारी यांच्या कार्यालयात घुसून त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे लखनऊ शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी चर्चेत आले होते. त्यानंतर आज ही धक्कादायक घटना घडली असल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. लखनऊ येथील खुर्शीद बाग येथील तिवारी यांच्या कार्यालयात भगव्या कपड्यांतील दोन अज्ञात व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आले. त्यांनी सोबत मिठाईचे डबे आणले होते. मात्र त्या डब्यांमध्ये चाकू होते असे सांगण्यात येत आहे. मीडिया न्यूजनुसार तिवारी व त्या दोघांनी बराच वेळ चर्चा केली आणि सोबत चहा घेतला. त्यानंतर त्या दोघांनी तिवारींवर गोळ्या झाडल्या व चाकूने त्यांचा गळा कापला आणि कोणी तिथे येण्याच्या आत तिथून निसटले. त्यानंतर तिवारींना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सदर घटनेची पोलिसांनी नोंद घेतली असून तपासकामाला सुरुवात केली आहे. तिवारींच्या कार्यालयातून पोलिसांनी हत्यारे व बंदुकीची काडतुसे जमा केली आहेत. तसेच तिवारींना आलेल्या शेवटच्या फोनचा क्रमांक पोलीस ट्रेस करत आहेत. तरी हल्लेखोर कोण होते आणि तिवारींच्या परिचयाचे होते का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून दुकाने व बाजारपेठा बंद करण्यात आली आहेत.