उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. तेथील एका ठगाने OLX वर चक्क मिग-23 या लढाऊ विमानाच्या विक्रीची जाहिरात टाकली. महाराष्ट्र टाइम्सच्या मीडिया न्यूजनुसार या विमानाची किंमत त्याने ९ कोटी ९९ लाख ९९९ रुपये इतकी असल्याचे या जाहिरातीत टाकले होते. ही जाहिरात सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्याने प्रशासनापर्यंत पोहचली आहे व आता पुढील चौकशी चालू आहे.
सन २००९ मध्ये भारतीय हवाई दलाने अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला भेट दिलेले हे विमान या विद्यापीठातील इंजिनिअर विभागाच्या प्रांगणात ठेवण्यात आले आहे. हे विमान तब्बल २८ वर्षे भारतीय हवाई दलाच्या सेवेत होते. हे विमान विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात OLX वर ३ ऑगस्टला टाकण्यात आली होती. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही जाहिरात खोटी असल्याचे सिद्ध झाले व OLX वरून ती जाहिरात हटवण्यात आली. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे डॉक्टर मोहम्मद वसीम अली यांनी या घटनेचा विद्यापीठाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असून त्याबाबतीत कसून चौकशी सुरू आहे असेही सांगितले.