कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, रुग्णांची संख्यादेखील वाढती आहे. सोमवारी राज्यामध्ये १२० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८९१ वर पोहचली आहे. तसेच मागील २४ तासांत मुंबई शहर उपनगरात ५७ नव्या कोरोना (कोविड-१९) रुग्णांचे निदान झालेले असून आता महानगरातील कोरोना बाधितांची संख्या जवळ जवळ ५०० वर जाऊन पोहोचली आहे. तर मुंबईत शनिवारी व रविवारी प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहर उपनगरातील मृतांचा आकडा ३४ वर पोहोचला आहे.
राज्यभरासह देशात कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव पाहता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (AIIMS)संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एक धोक्याचा इशारा दिला आहे. भारतात काही ठिकाणी कोरोना व्हायरस तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेला असल्याची चिंताजनक माहिती डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली. “जगाच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती बरी असली, तरी काही भागात वाढलेली कोरोनाग्रस्तांची संख्या चिंता वाढवणारी असल्याचे गुलेरिया यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.
रणदीप गुलेरिया म्हणाले की, संपूर्ण देशाचा विचार केला, तर सध्या भारत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या मध्यभागावर आहे. कोरोनाची लागण कुठून झाली याची कुठलीच माहिती नसलेल्या रुग्णांची संख्या वाढणारी आहे. हे तिसऱ्या टप्प्याचं लक्षण आहे. मुंबईचा काही भाग आणि देशातले कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कम्युनिटी स्प्रेड इतक्या झपाट्याने होत आहे अश्या ठिकाणी कोरोनाने आधीच तिसरा टप्पा गाठल्याचे रणदीप गुलेरीया यांनी सांगितले. तसेच “मुंबईच्या ज्या भागात कोरोनाने तिसरा टप्पा गाठला आहे त्या ठिकाणी परिस्थिती आटोक्यात आली नाही तर कोरोना झपाट्याने पसरेल आणि मुंबईची स्थिती न्यूयॉर्कसारखी होईल!” असा इशारा रणदीप गुलेरीया यांनी यावेळी दिला.