निर्भयाच्या चारही दोषींना आज पहाटे साडेपाचला फाशी देण्यात आली. फाशी दिल्यानंतर निर्भयाची आई ज्या आशादेवी सोसायटीत राहते, तिकडे गर्दी झाली. यानंतर आशादेवी या बिल्डिंगच्या खाली आल्या. फाशी दिल्यानंतर निर्भयाची आई आशादेवी म्हणाल्या, ‘मी मुलीचा फोटो गळ्याला लावला आणि म्हटलं, बेटा तुला आज न्याय मिळाला, मला माझ्या मुलीवर गर्व आहे. आज जर ती या जगात राहिली असती, तर मी एका डॉक्टरची आई म्हटली गेली असती.’
मीडियाशी बोलताना आशादेवी या भावूक झाल्या होत्या.आशादेवी म्हणाल्या, ‘मी देशभरातील महिलांना अपिल करते देशातील कुणाच्याही मुलीसोबत अन्याय होत असेल, तर अन्यायाशी लढताना त्यांना जरूर साथ द्या.’आशादेवी पुढे बोलताना म्हणाल्या, ‘देशातील मुलींसाठी माझा संघर्ष सुरूच असणार आहे, मी पुढेही हा लढा सुरू ठेवणार आहे, आजपासून देशातील मुली स्वत:ला सुरक्षित वातावरणात आहोत असं समजतील.’
निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी या आरोपींची नावं आहेत.
निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. २०१२ मध्ये घडलेल्या प्रकरणानंतर संतापाची एक लाट देशभरात उसळली होती. तसंच अनेक अशी प्रकरणं बाहेर आली होती जी तोपर्यंत बाहेर येऊ शकली नाहीत. मुंबईतल्याही काही प्रकरणांना याच प्रकरणामुळे वाचा फुटली. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी सगळ्या देशात एक आंदोलन उभं राहिलं होतं.