लोकप्रिय भाजप नेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा आज प्रवरानगर येथे पार पडला. या आत्मचरित्राचे प्रकाशन मोदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळासाहेब विखे पाटलांबद्दल बोलतांना मोदींनी संपूर्ण भाषण मराठीत केले.
भाषणाची सुरुवात मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज व अनेक वीरांची पावनभूमी असलेल्या महाराष्ट्राला वंदन करून केली. त्यानंतर त्यांनी बाळासाहेब विखे पाटलांच्या कार्याचे कौतुक केले. लोकसत्ताच्या मीडिया न्यूजनुसार त्यावेळी बोलतांना मोदी म्हणाले, “डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी स्वतःला महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित केले. त्यांनी शेतकऱ्यांचे व गरिबांचे जगणे अधिक सोपे केले. महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या जीवनाची कथा ऐकायला मिळते. प्रत्येक पक्षात त्यांचा आजही सन्मान होतो. त्यांनी गरीबांच्या विकासासाठी जे काम केले ते पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.” अशा शब्दांत मोदींनी भाजप नेते बाळासाहेब विखे पाटलांचे कौतुक केले.
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दिग्गज मंडळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला आपण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यासाठी मोदींनी काल ट्विट केले होते तेही मराठीतच होते.