भारतमातेच्या रक्षणासाठी उभे असलेल्या सुपुत्राला काल वीरगती प्राप्त झाली, देशाचे रक्षण करत असताना पुलवामा येथील चकमकीत सोलापूरचे सुनील काळे यांना हौतात्म्य प्राप्त झाले. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात काल सकाळी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. तर दशहतवाद्यांविरोधात लढत असताना महाराष्ट्राच्या या सुपूत्राला वीरमरण आले.
काल पहाटे लष्कर, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त मोहिमेत पुलवामा भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असताना या दरम्यान, तेथील बंडजू येथे दहशतवाद्यांशी चकमक उडाली.
शहीद सुनिल काळे गेल्या १७ वर्षांपासून देशाच्या सेवेत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची हेड कॉन्स्टेबल पदावर नियुक्ती करण्यात आली होती. सुनिल काळे यांना दोन भाऊ आणि एक बहीण आहे. जानेवारी महिन्यात ते शेवटचं गावी आले होते. याच महिन्यात पुन्हा एकदा ते गावी येणार होते. पण लॉकडाऊनमुळे त्यांना येता आलं नव्हतं. गावाच्या विकासासाठी निवृत्त झाल्यानंतर गावात चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्याचा त्यांचा मानस होता.