देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. काही जीवनावश्यक गोष्टी सोडल्या तर बाकी सगळं काही बंद आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे देशात २१ दिवसासाठी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता १४ एप्रिलला लॉकडाऊनला २१ दिवस पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन वाढणार का या गोष्टीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. राज्य सरकार आणि विश्लेषकांनी लॉकडाऊन वाढवण्यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. कारण अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
लॉकडाऊन संपवण्याचा साधा विचार जरी केला तरी सरकारला यासाठी मोठी तयारी करावी लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इतर गोष्टींबाबत थोडी सवलत दिली गेली तरी शाळा, धार्मिक कार्यक्रमावर मात्र बंदच ठेवण्यात येतील. तसेच अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील सहा महिने होणार नाहीत.
राज्य सरकारांनी केलेल्या या मागण्यांवर केंद्र सरकार विचार करत आहे. कारण प्रत्येक राज्यात वेगवेगळी परिस्तिथी आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. ज्यामध्ये अनेक मुख्यमंत्री यांनी लॉकडाऊन वाढवण्याबाबतच मत दिलं.
महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या अचानक वाढलेली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तर याआधीच लॉकडाऊन वाढवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी २ जूनपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याची मागणी केली आहे.