आंध्रप्रदेश मधील विशाखापट्टणम मध्ये एका गॅस कंपनी मधून आज पहाटे ३ वाजता अचानक वायू गळती झाली आणि त्यामुळे शेकडो लोकांना दवाखान्यांमध्ये उपचारासाठी न्यावे लागले. गळती झालेला विषारी वायु हा एवढा परिणामकारक आहे की याच्या संपर्कात येताच १० मिनिटांमध्ये कुठल्याही प्राण्याचा मृत्यू होतो.
सदर गॅस चा प्लांट हा २४ मार्च पासून लॉकडाऊन मूळे बंद होता, काल रात्री या प्लांट ला परत सुरू केल्या गेला आणि योग्य त्या नियमांची (ऑपरेटिंग प्रोसिजर)अंमलबजावणी न झाल्यामुळे ही वायुगळती झाली असे आंध्रप्रदेश मधील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वायू गळती झाली आहे असे कळताच नागरिकांमध्ये एकचं घबराट उडाली आणि त्यामुळे नागरिक घर सोडून बाहेर निघू लागले पण यामुळे या विषारी वायूचा उलटा परिणाम झाला, सैरावैरा धावू लागलेले लोक पटापट भोवळ येऊन रस्त्यावर पडू लागले तर कित्येकांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागला.
दुर्दैवी बाब म्हणजे या कारखान्यात काम करणारे काही कर्मचारी अजून पर्यंत या कारखान्यात अडकलेले आहेत पण त्यांच्या जिवंत असण्याच्या शक्यता अगदी धूसर आहेत. या विषारी वायूने या परिसरात कमीत कमी २ किलोमिटर परिघामध्ये प्रभाव केला असल्याचे समजते. आंध्र प्रदेशचे अधिकारी हा संपूर्ण परिसर रिकामा करत असल्याचे समजते.
भारतामध्ये विषारी वायू गळतीचे अनेक दुर्दैवी उदाहरणे आहेत, भोपाळ वायू गळतीमुळे तर पिढ्यानपिढ्या अक्षरशः शारीरिक व्याधींनी त्रस्त झाल्या आहेत. असल्या वायू गळतींना कसे रोखता येईल यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलायला हवीत.