“कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगात सगळीकडे अंधकार पसरलेला आहे, हा अंधार आपल्याला निरंतर प्रकाशाने दूर करायचा असून यासाठी रविवारी ५ एप्रिलला प्रत्येक भारतवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे, यासाठी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे पूर्ण बंद करायचे आहेत. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी दरवाज्यामध्ये किंवा बाल्कनीमध्ये उभे राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च अथवा मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून उजाळा करायचा आहे”, असे आवाहन मोदींनी केले आहे.
“या दिवशी प्रत्येकाने एकमेकाला तिमिरातून तेजोमयाकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशातील गरीब भावंडांमध्ये अत्यंत नैराश्येचे वातावरण आहे, म्हणूनच त्यांना निराशेकडून आशेकडे न्यायचे आहे. दारात एक दिवा लावताना आपण या लढाईत एकटे नाही असे एकमेकांना सांगून निराशेचा अंध:कार दूर करण्याचा संकल्प करायचा आहे”,असेही मोदींनी सांगितले. “मात्र हे करत असताना कोणीही एकत्र अजिबात यायचे नाही किंवा रस्त्यावर जमाव करायचा नाही, सोशल डिस्टन्सचे भान ठेवून प्रत्येकाने अनुकरण करायचे” आहे असाही संदेश त्यांनी देशवासीयांना दिला आहे.