पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी म्हणजे ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता प्रत्येकाच्या घरातील लाईट बंद करून ९ मिनिटे दिवे अथवा टॉर्च लावून कोरोना विरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र यामुळे ९ मिनिटे एकाच वेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका उदभवू शकतो. संभाव्य धोका लक्षात घेऊन आपल्या राज्यात, महानिर्मिती, महापारेषण, महावितरण व महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र या सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच जनतेनेही आवश्यक तितकेच लाईट चालू ठेऊन, दिवे, मेणबत्ती इ. लावावेत, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जनतेला केले आहे.
विजेच्या क्षेत्रात मागणी व पुरवठ्याचे संतुलन अत्यन्त आवश्यक असते. मागणी व पुरवठा समसमान असल्यास ५० हर्ट्झ फ्रिक्वेन्सी प्रमाण असते. भारतासारख्या देशात ५० हर्ट्झ फ्रिक्वेन्सी आदर्श मानतात. आणि व्यावहारिक तत्वावर ४९.१ ते ५१.१ हर्ट्झ ही सुरक्षित फ्रिक्वेन्सी आहे. पण मागणी किंवा पुरवठ्यात अचानक कमी किंवा जास्ती झाल्यास ग्रीड मध्ये बिघाड होऊन वीजनिर्मिती केंद्रे बँड पडू शकतात.
पंतप्रधान मोदींच्या आवाहणानंतर देशातील विजमागणी ही १५ ते २० हजार मेगा वॅट ने कमी होण्याची आशंका आहे आणि त्यानंतर ९ मिनिटांनी ही मागणी उसळी मारून पुन्हा पाहिलेसारखी होईल या तांत्रिक झटक्यामुळे वीजनिर्मिती केंद्रे व ग्रीड सयंत्रना मध्ये बिघाड होऊ शकते. त्यामुळे देशातील वीज पुरवठा केंद्रांमध्ये हे आव्हान पेलण्याची गरज आहे. राज्यातील सर्व वीज वितरण आणि निर्माण पुरवठा संस्थांना संबंधित बाबीबद्दल प्राथमिक अंदाज देण्यात आला आहे.