आज ४ नोव्हेंबरला रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबईतील त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मीडिया न्यूजनुसार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणामुळे पोलिसांनी अर्णब गोस्वामींना व इतर दोघांना अटक केली.
अन्वय नाईक हे ‘काँकर्ड डिझाइन्स लिमिटेड’ नावाच्या इंटिरियर डिझाईन कंपनीचे मालक होते. आपल्या अलिबाग येथील घरी त्यांनी मे २०१८ मध्ये आत्महत्या केली होती. तेव्हा त्यांच्या खिशात आढळून आलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सारडा या तिघांची नावे लिहिली होती. या तिघांनी आपले पैसे थकवल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. यासंदर्भात अलिबाग पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तेव्हा पुराव्यांच्या अभावी ही केस पोलिसांनी बंद केली होती. आता ती पुन्हा उघडली असून पोलिसांनी अर्णब गोस्वामींना अटक केले आहे व त्यांना चौकशीसाठी अलिबागला नेण्यात येत आहे.