जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस मुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच कोरोनामुळे इराण सरकारने ८५००० कैद्यांची सुटका केल्याचे वृत्त समोर आले. याच धर्तीवर भारतामध्ये कैद्यांची सुटका होण्याच्या मागणी होत असतांना, भारत सरकारने कैद्यांसाठी विशेष निर्देश तुरुंग प्रशासनाला दिले आहेत.
कोरोना विषाणूच्या फैलाव होण्याच्या पार्श्वभूमीवर तुरुंगात अगदी नव्यानेच भरती होणाऱ्या प्रत्येक कैद्याचे स्क्रीनिंग करण्यात यावे. नव्याने भरती होत असणाऱ्या कैद्यांना आवश्यकता असल्यास इतर कैद्यांपासून पूर्णतः वेगळे ठेवण्यात यावे. आधीपासून तुरुंगात असलेल्या सर्व कैद्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. क्षमतेपेक्षा जास्त बंदी असलेल्या कारागृहांतून बंद्यांना अन्य कारागृहांत हलविण्यात यावे, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
नव्याने घडत असणाऱ्या गुन्ह्यातील बंदी कारागृहात दाखल होतात. अमलीपदार्थांच्या विक्रीसारख्या गुन्ह्यात काही वेळा विदेशी मूळ असलेले बंदीसुद्धा नव्याने कारागृहात दाखल होतात. त्या माध्यमातून अनुचित असे प्रकार घडू नयेत म्हणून नवीन दाखल होणाऱ्या प्रत्येक कैद्याची प्राथमिक तपासणी करून स्क्रीनिंग करण्यात यावे आणि आवश्यकता असल्यास त्यांना अन्य कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात यावे. सर्दी, फ्ल्यूसारखे आजार असलेल्या बंद्यांना इतरांपासून वेगळे करण्यासाठी वेगळा वॉर्ड ठेवण्यात यावा ह्या सर्व सूचना सदर निर्देशात देण्यात आल्या आहेत.