प्राईम नेटवर्क : पाकिस्तानच्या घुसखोरी विरोधात केलेल्या सडेतोड कारवाईमध्ये काल बुधवारी भारतीय हवाई दलाचे एक मिग-२१ कोसळले. या हल्ल्यानंतर भारताचे फायटर पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान बेपत्ता आहेत. पाकिस्तानने भारतीय पायलट आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे आणि याबाबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पाकिस्तानकडून व्हायरल करण्यात आले आहेत. त्यांना सहीसलामत भारतात आण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नात असून हाच मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर आहे. अभिनंदन यांना कोणतीही इजा झाली नाही पाहिजे, अशा सक्त शब्दांत केंद्राने इस्लामाबादला सांगितले असून पाकिस्तानी लष्करानेही त्यांच्याशी योग्य वर्तणूक करण्याची हमी दिल्याचे सांगितले जाते.
भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या जवळपास ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या कारवाईने हादरलेल्या पाकिस्तानने काल (ता.२७) भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हवाई दलाला सडेतोड प्रत्युत्तर दिले. या कारवाईमध्ये पाकिस्तानचे एफ१६ लढाऊ विमान पाडण्यात आले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९४९च्या जिनेव्हा परिषदेनुसार युद्धातील लष्करी कैद्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीविषयी एक मार्गदर्शिका करण्यात आली आहे. वैमानिकांसाठीच्या प्रकरणात जिनेव्हा परिषदेत कोणतीही वेळ निश्चित केलेली नाही. अशावेळी दिल्ली आणि इस्लामाबाद दोघेही योग्य कालावधी मान्य करतील. केंद्र सरकारने पाकिस्तानी सरकारला वर्धमान यांना त्वरीत आणि सुरक्षित परत पाठवण्यास सांगितले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने ठरवले तर अभिनंदन यांना एका आठवड्याच्या आत किंवा १० दिवसांत परत पाठवले जाऊ शकते. सध्या सरकारसमोर वैमानिक अभिनंदन यांना सुरक्षित परत कसे आणि कधी आणायचे हा मोठा प्रश्न आहे.सरासरी दरवर्षी किमान तीन वेळा अशा सीमारेषा ओलांडण्याच्या घटना घडतात. अशावेळी त्या सैनिकाची किंवा कर्मचाऱ्याची ओळख पटली की काही तासांत किंवा काही दिवसांत परत पाठवले जाते. संबंधित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून त्याला हस्तांतरित केले जाते.