उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचं आज निधन झालं आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करत असताना वडिलांच्या अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे.
योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्ट यांनी दिल्लीतील ‘एम्स’मध्ये आज अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या मृत्यूची बातमी जेव्हा समजली, तेव्हाही योगी कोरोनासंदर्भात एका महत्त्वाच्या बैठकीत होते. निरोप मिळाल्यानंतरसुद्धा त्यांनी बैठक सुरुच ठेवली.
आईला भावनिक पत्र लिहित आदित्यनाथ यांनी आपला निर्णय कळवला. काही अधिकाऱ्यांनी योगी यांना वडिलांच्या अंत्यसंस्कारांना जाता यावं, यासाठी तयारी सुद्धा सुरु केली.मात्र त्यांनी आपण दिल्ली किंवा उत्तराखंडला जाणार नसल्याचं सांगितलंय.
आनंदसिंग बिष्ट हे बर्याच दिवसांपासून यकृताच्या दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर दिल्लीतील ‘एम्स’मध्ये उपचार सुरु होते. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले, मात्र आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.