प्राईम नेटवर्क : निवडणूक आणि युती यांचं समीकरण हे काय नवीन नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशातही ज्या युतीच घोंगड भिजत ठेवलं होत,त्यावर आता तोडगा निघण्याची शक्यता आहे. उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरलेली शिवसेना-भाजपची युती अखेर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करण्याची शक्यता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
केंद्रात व राज्यात सत्ता आल्यापासूनच एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेना-भाजपमध्ये युती होणार का, हा यक्ष प्रश्न झाला होता. त्यातच शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानं व भाजपवर सातत्यानं टीका करण्याची भूमिका घेतल्यानं युती होणं अधिकच कठीण झालं होतं. त्यातही शिवसेनेनं युतीसाठी काही अटी घातल्यानं संभ्रम वाढला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि तेव्हापासून युतीची शक्यता वर्तवली जात होती.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज त्यावर शिक्कामोर्तब केला. अमित शहा हे आज ‘मातोश्री’ निवासस्थानी येणार असून उद्धव यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर युतीची घोषणा होऊ शकते, असं राऊत म्हणाले. युतीतील अटी-शर्तींबाबतची चर्चा पूर्ण झाली आहे असंही त्यांनी सांगितलं.