Home आध्यात्मिक अष्टविनायक पहिला गणपती : काय आहे मोरगावच्या मोरेश्वर मंदिराची कहाणी ?

अष्टविनायक पहिला गणपती : काय आहे मोरगावच्या मोरेश्वर मंदिराची कहाणी ?

0

गणपती बाप्पा मोरया ! गणपती बाप्पा आले की बालगो पाळांचा कल्लोळ, युवकांचा जल्लोष, आरतीचा सोहळा, प्रसादासाठीची लगबग आणि आनंदाने गजबजलेलं संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं असतं. गणेश आगमनाच्या शुभप्रसंगी आपण अष्टविनायक दर्शनाची सफर करणार आहोत. आज पहिल्या दिवसा निमित्त पाहुयात अष्टविनायकां पैकी पहिला गणपती ‘मोरगावचा मोरेश्र्वर’ ज्याला मयुरेश्वर या नावानेही ओळखलं जातं. चला तर मग पाहुयात गणपती बाप्पाचं नाव मोरेश्वर का पडलं आणि काय आहे मोरगावच्या मोरेश्वराच्या मंदिराची कहाणी.

morgaon mayureshwar

गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी याचा सुपुत्र सिंधूने सूर्याची उपासना करून अमरत्वाचा वर मिळवला. अमरत्वामुळे त्याचा अहंकार त्याच्या मस्तकात गेला. तो देव देवतांना त्रास देऊ लागला. त्याने इंद्राचा पराभव केला आणि स्वर्ग आपल्या ताब्यात घेतला. हे पाहून भगवान विष्णूंनी त्याला युद्धाचं आव्हान केलं मात्र सिंधूने विष्णूचाही सहज पराभव केला.

shree ganesh

पुढे सिंधूने सत्यलोक आणि कैलास यावर स्वारी करायचं ठरवलं. सर्व देवांना त्याने गंडकी नगरीत बंदिवासात टाकले. दुःखी देवतांनी गणेशाची आराधना केली. गणेशाने त्यांना मदत करण्याचं वचन दिल, देवांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी सिंधू वर चाल करून गेले.

पुढे गणेशाचे व सिंधूचे जोरदार युद्ध झाले. गणेश एका मयूरावर अर्थात मोरावर बसून युद्ध करू लागला. शेवटी गणेशाने सिंधूचा वध करून त्याच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकले. त्यापैकी मस्तक म्हणजेच डोकं जिथे पडलं त्याला मोरगाव म्हणतात कारण मोरावर बसून गणपती बाप्पांनी दैत्य संहार केला होता. तेथेच गणेश भक्तांनी विनायकाच्या मूर्तीची स्थापना केली.

ashtavinayak moreshwar temple

हा अष्टविनायकांपैकी पहिला गणपती मोरगावचा मोरेश्र्वर ! या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. मोरेश्वराचे हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. आपण लहान असल्या पासून ऐकत आलेली ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ हि गणपती बाप्पांची आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात रचली असं म्हटलं जातं. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.

map morgaon moreshwar

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव वसलेलं आहे. बारामतीपासून केवळ ३५ कि. मी. चा प्रवास करून तुम्ही मोरगावला दर्शनासाठी जाऊ शकता. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. मोरगावला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय हमखास उपलब्ध असते. मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला एक अद्भुत प्रसन्नता जाणवेल. तेथील सौंदर्य आणि प्रसन्नतेने मन तृप्त होतं. मोरगावच्या मोरेश्वर मंदिरात गणेशाची सुंदर रत्नजडित प्रतिमा पाहायला मिळते. मोरेश्र्वराच्या डोळ्यांत व बेंबीत मनमोहक हिरे बसवलेले आहेत. मंदिरावर डोळे दिपून टाकणारं सुंदर असं नक्षीकाम पाहायला मिळतं. मंदिराच्या भोवती प्राचिन दगडी बुरूज आहेत. एकंदरीत मोरगावच्या मोरेश्वर मंदिराची माहिती शब्दांत सांगणे अशक्यच ! ती अनुभवण्यासाठी एकदा मोर गावला नक्की भेट द्या.