आयपीएलमधील एक लोकप्रिय संघ असलेल्या सीएसके अर्थात चेन्नई सुपरकिंग्सचा महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार आहे. या संघाचे आणि धोनीचे चेन्नईत बरेच चाहते आहेत. अशाच एका धोनी आणि सीएसकेच्या चाहत्याने चक्क आपल्या घराला सीएसकेच्या रंगांप्रमाणे पिवळा व पांढरा रंग दिला आहे तसेच भिंतींवर धोनीची चित्रही काढली आहेत. या गोष्टीची बऱ्याच न्यूज पोर्टल्सने दखल घेतली असून धोनीचा हा आगळावेगळा चाहता चांगलाच चर्चेत आला आहे.
हा पराक्रम केलेल्या व्यक्तीचे नाव गोपीकृष्णन असे असून तामिळनाडूमधील कडलूर जिल्ह्यातील अरंगूर या गावचा तो रहिवासी आहे. तो धोनीचा खूप मोठा चाहता आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघाची आतापर्यंतची खेळी निराशाजनक ठरली. धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने ही आयपीएल तो खेळात असलेली शेवटची आयपीएल असणार आहे. त्यामुळे या चाहत्याने धोनीवरील प्रेम व सीएसके संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपले घर पिवळ्या रंगाने रंगवले. या सर्व कामासाठी त्याने तब्बल दीड लाख रुपये खर्च केले. सुपरकिंग्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या घराचे फोटो शेअर केले असून या व्यक्तीचे सगळीकडे कौतुक होत आहे.