Home खेळ स्पर्धा रामायण बघून मिळाली क्रिकेट खेळण्याची प्रेरणा : वीरेंद्र सेहवाग

रामायण बघून मिळाली क्रिकेट खेळण्याची प्रेरणा : वीरेंद्र सेहवाग

0


भारतीय संघाचा एकेकाळचा सर्वात आक्रमक सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहून आपले वर्चस्व मिळविण्याची प्रेरणा ही चक्‍क रामायणामधील अंगदकडून घेतल्याचे सांगत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला आहे.

सध्या करोनाच्या धोक्‍यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे लोकांनी आपापल्या घरातच राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच खेळाडूंनासुद्धा घरातच थांबावे लागत आहे. या काळात लोकांना घरातच करमणूक व्हावी यासाठी दूरदर्शन वाहिनीने तिच्या सुरवातीच्या काळातील गाजलेल्या मालिकांचे प्रक्षेपण पुन्हा सुरू केले असून त्यात रामायण या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या मालिकेचाही समावेश आहे.

“या मालिकेचे पूर्वी पाहिलेले भाग पुन्हा एकदा पाहण्याची संधी इतरांप्रमाणे मलाही मिळाली. लहानपणी ही मालिका मी पाहिली होती. त्यामध्ये सीता मातेला रावणाच्या कैदेतून सोडविण्यासाठी प्रभू श्रीराम हे लंकेला प्रयाण करणार असतात. मात्र, युद्ध टाळण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून ते अंगद या वानर युवराजाला रावणाकडे बोलणी करण्यासाठी पाठवतात. त्यावेळी भर दरबारात अंगद पाय रोवून उभा राहतो व माझा केवळ पाय हलवून दाखविला तर श्रीरामांचा पराभव झाल्याचे मी जाहीर करेन असे आव्हान देतो. दरबारातील एकही राजा नव्हे तर दस्तूरखुद्द रावण देखील अंगदचा पाय हलवू शकत नाही”

“खुद्द रावण अंगदचे पाय हलवण्यासाठी येतो तेव्हा अंगद त्याचे पाय बाजूला करतो आणि रावणाला श्री रामाचे पाय धरा तेच तुम्हाला माफ करतील. अंगद याचा हा निर्धार व त्याचा निश्‍चय पाहुनच मला देखिल खेळपट्टीवर गेल्यावर पाय रोवून उभे राहण्याची तसेच कोणत्याही परिस्थितीत विजयाचे प्रयत्न न सोडण्याची प्रेरणा मिळाली अशा शब्दात सेहवागने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट केली असून त्याला प्रचंड लाईक्‍स मिळाल्या आहेत.”पैर हिलाना मुश्‍किल ही नही नामुमकीन है”, अशी कॅचलाइनही सेहवागने दिली आहे. सोबत रामायण मालिकेतील अंगदचा तोच क्षण दाखविणारा फोटोही त्याने पोस्ट केला आहे.