Home खेळ स्पर्धा भारतीय महिला संघातील खेळाडू जेमिना आणि स्मृती यांची आयसीसी २०-२० क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत...

भारतीय महिला संघातील खेळाडू जेमिना आणि स्मृती यांची आयसीसी २०-२० क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत भरारी

0

प्राईम नेटवर्क : भारतीय महिला संघातील खेळाडू जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मानधना यांनी आयसीसी ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत भरारी घेतली आहे. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-ट्वेंटी मालिकेत ०-३ असा पराभव पत्करावा लागला असला तरी महाराष्ट्राच्या कन्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. वेस्ट इंडीजची अष्टपैलू खेळाडू डिंड्रा डॉटिनने अव्वल स्थान पटकावले आहे.

जेमिमाने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत १३२ धावा मारल्या आणि त्यामुळेच चार स्थानांच्या सुधारणेसह क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. गेल्या आठवड्यात वन डे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या स्मृतीने या मालिकेत १८० धावा मारल्या. तिनेही चार स्थानांच्या सुधारणेसह सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. स्मृतीने या मालिकेत दोन अर्धशतकी खेळी केल्या. भारताची फिरकीपटू राधा यादवने अव्वल दहामध्ये प्रवेश केला आहे.ती १८ स्थानांनी वर सरकली आहे. दीप्ती शर्मा 14व्या स्थानी पोहोचली आहे.

न्यूझीलंडच्या सोफी डेव्हीनने भारताविरुद्ध १५३ धावा मारल्या आणि तिच्या ८व्या क्रमवारीत तीन स्थानांची सुधारणा झाली. कर्णधार अॅमी सॅटरवेटनेही २३वरून १७व्या स्थानी झेप घेतली. गोलंदाजीतली ताहूहू पाच स्थानांच्या सुधारणेसह ११ व्या स्थानावर आली आहे. वेस्ट इंडीजच्या डॉटीनने अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान पटकावले. तिने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत १५८ धावा व ३विकेट्स घेतल्या

संघांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर कायम आहे, तर न्यूझीलंडने इंग्लंडकडून दुसरे स्थान हिसकावून घेतले. वेस्ट इंडिज आणि भारत अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.