प्राईम नेटवर्क : भारतात बुद्धिबळ हा खेळ विश्वनाथन आनंदच्या विश्वविक्रमी कामगिरीने प्रकाशझोतात आला होता. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न जगभरातील ग्रॅण्डमास्टर्स पाहात होते. मात्र,बुद्धिबळाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये केला जाणार नाही, यावर ऑलिम्पिक समिती ठाम होती. अखेर प्रदीर्घ प्रयत्नानंतर यश आले आहे.आता रॅपिड व ब्लिट्झ या दोन प्रकारच्या स्पर्धा २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळविल्या जातील. याबाबतची अधिकृत घोषणा फिडेचे अध्यक्ष अकार्डे ड्वारकोविच यांनी केली. फिडेने याचे पत्रकही काढले.
२०२४ मध्ये ‘फिडे’ संस्थेला १०० वर्षे पूर्ण होतील. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बुद्धिबळ खेळविला गेल्यास या सुवर्णमहोत्सवी वर्षातील मोठी भेट असेल, असे फिडे अध्यक्षांनी म्हटले. या खेळाच्या ऑलिम्पिक समावेशासाठी १२ फेब्रुवारीपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. ही मोहीम यशस्वी होत असल्याचे अकार्डे यांनी सांगितले.
अकार्डे म्हणाले, ‘बुद्धिबळ आता २०२४ चा सदस्य असेल. रॅपिड व ब्लिट्झचा समावेश पॅरिस आॅलिम्पिकमध्ये झाला आहे. बुद्धिबळ जगात कोट्यवधी लोक खेळतात. एक ‘ग्लोबल खेळ’ म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. रॅपिड आणि ब्लिट्झने ते सिद्ध केले आहे. या दोन्ही प्रकारच्या खेळाचा फॉर्मेट,नियम व अटी तयार करून त्या ऑलिम्पिक समितीकडे पाठविल्या जातील.
रॅपिड या खेळात रशिया, तर ब्लित्झ या खेळात नॉर्वे अव्वल आहे. जर हा खेळ २०२४ मध्ये समाविष्ट झाला तर जगभरात या खेळाडूंची संख्या प्रचंड वाढेल. ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश व्हावा, यासाठी जगभरातील खेळाडू प्रतिक्षेत आहेत. २०२४ मध्ये का होईना हा खेळ समाविष्ट होईल. हा निर्णय जागतिक बुद्धिबळासाठी क्रांती घडवून आणणार आहे, असेही फिडे अध्यक्षांनी म्हटले आहे.