कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा जवळपास सर्व स्तरांवरील शिक्षण ऑनलाईन पद्धतीने होत आहे. यासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या काही प्लॅटफॉर्म्स पैकी गुगलचे व्हिडीओ कॉन्फरन्स ऍप गुगल मीट हे आघाडीवर आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी, बैठकींसाठी जास्तीत जास्त लोक या ऍपचा वापर करीत आहेत. गेले काही दिवस गुगल मीट मोफत सेवा देत होते. मात्र वापरकर्त्यांच्या संख्येत झालेली वाढ पाहता गुगलने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२० नंतर गुगल मीटची मोफत सेवा फक्त १ तास म्हणजेच ६० मिनिटांसाठी उपभोगता येणार आहे. यापेक्षा अधिक वेळ सेवा वापरण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. गुगल मीटच्या G-suit तसेच G-education या दोन्ही सेवांसाठी हा नियम लागू होणार आहे. याशिवाय मिटिंग रेकॉर्ड करण्याची सेवादेखील आता विनाशुल्क राहिलेली नाही. नवीन अपडेटनुसार यासाठी महिन्याला १८०० रुपये म्हणजे २५ डॉलर्स इतका खर्च येणार आहे.