महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल काल (शुक्रवारी) जाहीर करण्यात आला. त्यात सातारा जिल्ह्यातील प्रसाद चौघुले याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला. सर्वसाधारण वर्गातून प्रसाद चौघुले प्रथम, उस्मानाबाद जिल्ह्यातील रवींद्र शेळके मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम आणि अमरावती जिल्ह्यातील पर्वणी पाटीलने महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. यंदाच्या निकालावर अभियंत्यांचेच वर्चस्व राहिले आहे.
एमपीएससीतर्फे १३ ते १५ जुलै, २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत एकूण ४२० विद्यार्थी पात्र झाले आहेत. राज्य सेवा (पूर्व) परीक्षा १७ फेब्रुबारी रोजी मुंबईसह अन्य ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली होती.
जाहीर झालेल्या अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाइलमध्ये पाठवण्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे, असे आयोगाने स्पष्ट के ले आहे.
आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे चीज झाले. माझे वडील विद्युत विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहे. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०१७ मध्ये अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. त्यानंतर एक वर्ष पुण्यात खासगी कंपनीत नोकरी करत होतो. त्याचवेळी राज्यसेवेची तयारीही करत होतो. सहज म्हणून एक प्रयत्नही केला होता. त्यात यश आले नाही. मग पूर्णतयारीनिशी २०१९ची परीक्षा दिली. परीक्षेसाठी पूर्ण वर्षांचे नियोजन करून अभ्यास केला. मुलाखतीच्या तयारीसाठी खासगी शिकवणी लावली होती. आता पुढे जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेची तयारी करण्याचा मानस आहे