गुरुवार दिनांक १९ सप्टेंबरला रात्री १० च्या सुमारास अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे भर रस्त्यावर गोळीबार झाला. या गोळीबारात एक जण ठार तर ५ जण जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान म्हणजेच व्हाइट हाऊस पासून केवळ ३ किलोमीटर्स अंतरावर असलेल्या कोलंबिया रस्त्यावर सदर घटना घडली असल्याचे अमेरिकन प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे. अमेरिकेतील रॉयटर्स या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोलीस वेळेवर पोहचू शकले नाही. तसेच हा हल्ला कोणी घडवून आणला, यात दहशतवाद्यांचा हात आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी २ व्यक्ती AK स्टाईलच्या रायफल्सने गोळीबार करतांना दृष्टीस पडल्याचे सांगितले. तरी पोलीस या दोन संशयितांच्या शोधात आहेत. अमेरिकेच्या एबीसी 7 न्यूज चॅनेलच्या एका पत्रकाराने ट्विटरवर या घटनेची छायाचित्रे आणि अपडेट्स पुरवले.
अशा घटना अमेरीकेत वारंवार घडत असून ऑगस्ट २०१९ पर्यंत जवळपास ३०० वेळा गोळीबार झाल्याची नोंद आहे आणि त्यात १,२१९ लोक जखमी तर ३३५ लोक ठार झाले आहेत.