Home जागतिक जगातील सर्वप्रथम कार्बन न्युट्रल शहर बनवण्यासाठी कोपनहेगनची यशस्वी वाटचाल !

जगातील सर्वप्रथम कार्बन न्युट्रल शहर बनवण्यासाठी कोपनहेगनची यशस्वी वाटचाल !

0

प्राईम नेटवर्क : डेन्मार्क देशाची राजधानी कोपनहेगन जगातील सर्वप्रथम ‘कार्बन न्युट्रल’ शहर ठरणार आहे. त्या दृष्टीने स्थानिक प्रशासन आणि नागरिक सातत्याने प्रयत्नशील असून हे प्रयत्न लवकरच शंभर टक्के यशस्वी होणार असल्याची चिन्हे आहेत. यासाठी वाहनांच्या धुरामुळे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या कार्बनचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जात असून, कोपनहेगन शहर आता संपूर्णपणे ‘बायसिकल फ्रेंडली’ बनत आहे. त्या दृष्टीने या शहरामध्ये सुमारे ३७५ किलोमीटर क्षेत्रामध्ये ‘बायसिकल लेन्स’ बनविण्यात आल्या असून, या शहराचे नागरिक असलेल्या सुमारे ६००,००० नागरिकांकडे स्वतःच्या सायकल आहेत, व नागरिक सायकलींचा वापर आवर्जून करतही आहेत.

२०१७ साली कोपनहेगन शहरामध्ये वातावरण बदलासाठी जबाबदार असणाऱ्या हानिकारक वायूंचे प्रमाण १.३७ मिलियन टन इतके होते. २००६ साली असलेल्या प्रमाणाच्या मानाने हे प्रमाण सुमारे चाळीस टक्के कमी असून, भविष्यकाळामध्ये हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि नागरिक सातत्याने प्रयत्नशील आहेत.

कोपनहेगन शहरामध्ये खास ‘रिन्युएबल एनर्जी कंपनी’ असून, संपूर्ण शहरासाठी आवश्यक असणारा वीजपुरवठा, विंड टर्बाईन्स द्वारे वीजनिर्मिती करून केला जातो. या सर्व उपाययोजनांमुळे शहरातील प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर खाली आली आहे.कोट्यवधींच्या संपत्तीची गुंतवणूक तीनशे साठ अतिरिक्त नव्या विंड टर्बाईन्सच्या उभारणीकरिता करण्यात आली असून, वीजनिर्मितीसाठी कोळशाच्या ऐवजी इतर इको फ्रेंडली पर्याय अवलंबले जात आहेत.

पृथ्वीच्या वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांना, ग्लोबल वॉर्मिंगला तोंड देण्यासाठी केवळ कोपेनहेगनच नाही तर जगभरातील सुमारे सत्तर शहरे सिद्ध होत आहेत. २०५० सालाच्या आधीच कोपनहेगन जगातील सर्वप्रथम कार्बन न्युट्रल शहर ठरण्याकडे वेगाने यशस्वी वाटचाल करीत आहे.