प्राईम नेटवर्क : आता तुम्ही म्हणाल, हे काय भलतंच ऐकायला मिळतंय आजकाल ? मंडळी “गब्बर इज बॅक” हा अक्षय कुमारचा चित्रपट आठवला का ? ज्यात मृत व्यक्तीला जगवण्यासाठी थोडक्यात पैसे काढण्यासाठीचे प्रयत्न दाखवलेत. डॉ.चे वेगळे रूप या चित्रपटामूळे समोर आले. हे जरी काही अंशी खरे असले तरी देवाचा पृथ्वीवरचा अवतार म्हणजे डॉक्टर असे आपण मानतो. तेच गंभीर रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून काढतील असा आपला दृढ विश्वासही असतो, पण कधी कधी तेही हतबल असतात. त्यांच्या प्रयत्नांना कायम यश मिळेलच असे नाही. यातील सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे नातेवाईकांना मृत्यूची खबर देणे.
ही बातमी आहे डॉ. लुईस प्रोफेटा या अवलियाची. तरुण व्यक्ती जर मृत झाली तर त्या व्यक्तीला त्याच्या फेसबुक अकाऊंट वरून जाणून घ्यायचा ते प्रयत्न करतात. सेंट व्हिन्सेंट हॉस्पिटल-इंडियाना पुलिस मधील हे डॉ. एका ट्विट मध्ये एखाद्या मृत तरुण/तरुणीशी संवाद साधल्या प्रमाणे लिहितात, “तू जरी या जगात नसलास तरी तुझी ही वाईट बातमी तुझ्या घरच्यांना सांगण्यापूर्वी मी तुझे फेसबुक प्रोफाइल पाहीन,त्यामुळे मला जाणवेल कि तू किती मजेत आयुष्य जगलास. तुझे मित्रमंडळी, नातेवाईकां सोबत साजरे केलेल्या दिवसांचे फोटो बघून मला अंदाज येईल की मला कोणाला तुझ्या मृत्यूची खबर द्यायची आहे आणि त्यानंतर जे होणार ते बघायला तू नाहीस हेच नशीब,कारण हे हृदय पिळवटून टाकणारे रडणे,ओरडणे बघणं खूप अवघड असतं. अजून ५ मिनिटांनी ते पूर्वी सारखे नसतील, कारण ते तुझा फक्त हाडा मांसाचा निर्जीव देह बघतील.”
डॉ. चे हे ट्विट नक्कीच हृदय हेलावणारे आहे. माणुसकीच्या नात्याने आणि प्रेमाचा ओलावा ठेवून इतकी अवघड बातमी देण्यासाठी उचलेले पाऊल खूप हिमतीचे आहे. त्या मृत जीवाला प्रेमाने आदरांजली वाहून शेवटाचा निरोप अत्यंत सुंदरतेने देण्याच्या या अवलिया डॉ.च्या निर्णयाला मानाचा मुजरा.