जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनासारख्या महामारीच्या उपचारासाठी अजूनही अधिकृत लसीचा शोध लागलेला नव्हता मात्र इस्रायलमधील संशोधकांना कोरोनावर मात करण्यासाठी लस तयार करण्यात यश आलं असल्याचा दावा त्यांच्या मंत्र्यांनी केला आहे.
इस्त्रायलचे संरक्षण मंत्री नफताली बेनेट यांनी सोमवारी दावा केला की देशाच्या संरक्षण जैविक संस्थेने कोरोना विषाणूची लस बनविली आहे. ते म्हणाले की कोरोनाला रोखण्यासाठी अँटीबॉडी तयार करण्यात संस्थेने खूप मोठे यश संपादन केले आहे. तसेच कोरोना व्हायरस लसीला विकसित करण्याचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे संशोधक आता त्याच्या पेटंट आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची तयारी करत असल्याची माहिती नफताली बेनेट यांनी दिली आहे.
नफताली बेनेट म्हणाले की, कोरोना व्हायरस लसीच्या विकासाचा टप्पा आता पूर्ण झालेला आहे. डिफेन्स इन्स्टिट्यूट आता ही लस पेटंट करण्याच्या विचारात आहे. पुढील टप्प्यात, संशोधक व्यावसायिक उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी संपर्क साधतील.तसेच या महान यशाबद्दल मला संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा अभिमान असल्याचे देखील बेनेट यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे इस्रायलमधील संशोधकांच्या या दाव्यामुळे आता संपूर्ण जगाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे इस्रायलचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारत इस्रायलकडून तंत्रज्ञान लवकरचं घेईल असं सांगण्यात येत आहे.