प्राईम नेटवर्क : गूड मॉर्निंग फ्रेंडस,रेडिओ म्हणलं की काय आठवत ओ तुम्हाला, “ये आकाशवाणी केंद्र है, और आप सून रहे है आप की फर्माईश !” “इयम् आकाशवाणी, सम्प्रति वार्ता: श्रूयन्ताम्” “ “अमीन सायानी” आणि बरच काही. लहानपणी विविध भारती, गीतमाला आणि आता विविध एफ.एम. स्टेशन्स द्वारे मनोरंजन करणारा एकमेवाद्वितीय म्हणजे आपला लाडका रेडिओ.
आपल्या लहानपणी रेडिओ हेच मनोरंजनाचे साधन होते. मंगल प्रभात सुरू झाली की चला उठा आता.. वाजले किती बघा.. कामगार सभेची स्वरावली वाजली की अगं बाई..उशीर झाला..अजून भाजी पोळी व्हायची आहे..असे आवाज स्वयंपाकघरातून यायचे.. संध्याकाळी बातम्यांच्या रूक्ष आवाजाच्या साथीने चहाचा आस्वाद घ्यायचा अन रात्रीच्या ‘आपली आवड’ च्या संगतीने डोळे मिटायचे. जरा जास्त शौकीन असलेला माणूस रेडिओ सिलोन, बिनाका गीतमाला, विविध भारती वगैरे सापडतंय का हे खुंटय़ा पिळून पहात असत..धावते समालोचन ऐकण्यासाठी तर क्रिकेटप्रेमींचे कान दिवसभर रेडिओला चिकटलेले असायचे. तेव्हाचे रेडिओही आवाजापेक्षा खरखराट करणारेच असायचे पण तरीही तो असहय वाटायचा नाही..कारण रेडिओ हे तेव्हा विरंगुळेच सुंदर साधन होत.
मग दूरदर्शनच्या आगमनाने रेडिओ मागे पडला. समोर चित्रं पहायला मिळत असताना आवाज नुसता कोण ऐकणार? यानंतर मोबाईल आणि सोशल मीडियामुळे रेडिओ हा दुर्लक्षित होता पण आता एफएमच्या आगमनानंतर रेडिओला चांगलाच शुद्ध प्राणवायू मिळाला आहे,म्हणायला काही हरकत नाही. रेडिओचा शोध १८८५ साली इटालियन भौतिकशास्त्रज्ञ मार्कोनी याने लावल्याचे मानले जाते. मात्र त्या आधीपासूनच जगातल्या विविध भागांत विविध बिनतारी प्रक्षेपणाचे प्रयोग सुरू होते. रेडिओचा भारतातला इतिहास तसा जुना आहे.
तुम्हाला माहिती आहे का? इंडियन ब्रॉडकास्टींग कंपनीने मुंबई व कोलकात्यातल्या दोन रेडिओ स्टेशन्सच्या माध्यमातून प्रसारणाला सुरुवात केली होती. पुढे ही कंपनी दिवाळखोरीत गेली व रेडिओ प्रसारण सरकारने आपल्या ताब्यात घेतले. १९३६ साली त्याला ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे नाव मिळाले.ऑल इंडिया रेडिओला ‘आकाशवाणी’ हे नाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. स्वातंत्र्यानंतर भारतात रेडिओची मोठी भरभराट झाली. विविध भारतीने रेडिओवरच्या मनोरंजनाला एक वेगळी उंची बहाल केली. टीव्हीच्या आगमनानंतर आकाशवाणीची पीछेहाट सुरू झाली. १९८२ साली भारतात रंगीत दूरचित्रवाणी संच आले व रेडिओ मागे पडला. रेडिओतल्या बदलाबरोबरच रेडिओ संचातही अनेक बदल झाले.
१३ फेब्रुवारी १९४६ मध्ये युनायटेड नेशन्स रेडिओची स्थापना झाली होती, यूनेस्कोच्या महासंचालकांनी तिचा प्रस्ताव मांडला होता.हा दिवस साजरा करायचा उद्देश म्हणजे जनतेमध्ये रेडिओ सारख्या प्रभावी प्रसार माध्यमाबद्दल जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणे आणि रेडिओमार्फत माहितीचा साठा उपलब्ध करून प्रदान करणे, तसेच ब्रॉडकास्टर्स नेटवर्किंग आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे.
सध्या मोबाइलमध्ये उपलब्ध असलेल्या रेडिओंमुळे एक नवीनच क्रांती झाली आहे..आणि कमालीची गोष्ट म्हणजे यूट्यूब,ट्विटर,फेसबूक च्या जमान्यात पण रेडिओ ने आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. सध्या भारतातल्या ७२ शहरांमध्ये खाजगी एफएम वाहिन्या कार्यरत आहेत.आज ही रेडिओ हे प्रभावी माध्यम समजले जाते. चला तर मग श्रोतेहो आजच्या या दिवसाच निमित्त साधून जुन्या आठवणीत नव्याने रमुया.