Home मनोरंजन ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा वितरण सोहळा संपन्न; ‘या’सिनेमाला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार...

६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा वितरण सोहळा संपन्न; ‘या’सिनेमाला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार तर मराठी चित्रपटांनी मारली अनेक पुरस्कारांमध्ये बाजी

0

चित्रपटसृष्टीतील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा ६६वा वितरण सोहळा काल अर्थात सोमवारी दिल्ली येथे संपन्न झाला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर या मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तर कुणाला कोणते पुरस्कार प्रदान करण्यात आले याबद्दल थोडक्यात या वृत्तात जाणून घेऊयात…

आयुषमान खुराणा याला ‘अंधाधून’ या चित्रपटासाठी तर विकी कौशल याला ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कीर्ती सुरेश हिला ‘महानटी’ या चित्रपटासाठी देण्यात आला. याशिवाय श्रीराम राघवन यांच्या ‘अंधाधून’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरविण्यात आले. स्वानंद किरकिरे याला ‘चुंबक’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘नाळ’ चित्रपटातील श्रीनिवास पोकळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार भोंगा या चित्रपटाला मिळाला. तसेच पॅडमॅन या चित्रपटाला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि पाणी या चित्रपटाला पर्यावरण विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रकृती बिघडली असल्याने अमिताभ बच्चन या सोहळ्याला गैरहजर होते. त्यांना ५०वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता.