भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी सोनी टीव्ही व अमिताभ बच्चन यांच्याविरुद्ध लातूर पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. अभिमन्यू पवार यांनी सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती या मालिकेतील एका प्रश्नातून अमिताभ बच्चन यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची एफआयआर अद्याप दाखल करण्यात आली नसून तक्रारीवर पोलीस विचार करीत आहेत असे मीडिया न्यूजवरून समजले.
या तक्रारीत अभिमन्यू पवार यांनी असे लिहिले आहे की, “कौन बनेगा करोडपती या सोनी टीव्हीवरील कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी एका स्पर्धकाला ’25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. भीमराव आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी यापैकी कोणत्या शास्त्राच्या प्रती जाळल्या?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता व त्यासाठी 1. विष्णु पुराण 2. भगवद्गीता 3.ऋग्वेद 4. मनुस्मृति हे चार पर्याय देण्यात आले होते. हे चारही पर्याय म्हणजे हिंदू धर्मग्रंथांची नावे आहेत. त्यांनी चारही पर्यायांत केवळ हिंदू धर्मग्रंथाच्या नावांचा उल्लेख करून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या आहेत व हिंदू आणि बौद्ध धर्मात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न या प्रश्नातून सोनी टीव्हीने केला आहे.” असे अभिमन्यू पवार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.