Home मनोरंजन १४ वर्षांनंतर झाला खुलासा: शक्तीमान मालिका अचानक का बंद झाली याचं समोर...

१४ वर्षांनंतर झाला खुलासा: शक्तीमान मालिका अचानक का बंद झाली याचं समोर आलं कारण…

0

एक वेळ होती जेव्हा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर शक्तीमान अधिराज्य करायचं. मात्र अचानक शक्तीमान मालिका बंद झाली आणि त्या काळातील चिमुकल्यांचा जणू टीव्हीवरचा विरंगुळाच हरवून गेला. पण मालिका नक्की बंद का झाली याचं कारण तब्बल १४ वर्षांनंतर, म्हणजेच आता काही दिवसांपूर्वी समोर आलं. स्वतः शक्तीमान अर्थात मुकेश खन्ना यांनी या गोष्टीचा खुलासा केला. महाराष्ट्र टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ‘सुरुवातीच्या काळात शक्तिमान ही मालिका नवीन होती तेव्हा केवळ शनिवारी सकाळी आणि मंगळवारी संध्याकाळी प्रदर्शित केली जायची. हे वेळ नॉन प्राइम टाइम असूनही अगदी कमी वेळेत मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, विशेषतः लहान मुलांना ही मालिका फारच आवडू लागली.’

मुकेश खन्ना म्हणाले, “या मालिकेसाठी दूरदर्शन वाहिनीला ३.८० लाख रुपये द्यावे लागत होते. तरी देखील मालिकेच्या १००-१५० एपिसोडने चांगली कमाई केली होती.” पुढे मुकेश खन्ना म्हणतात, “शक्तीमानची लोकप्रियता पाहता दूरदर्शन वाहिनीने मला सल्ला दिला की ही मालिका रविवारी प्रदर्शित करायला हवी. लहान मुलं आणि मोठ्यांनाही सुट्टी असल्याने मालिकेला आणखीनच चांगला प्रतिसाद मिळेल. मला ही कल्पना आवडली आणि आम्ही शक्तीमान मालिका रविवारी चालू देखील केली. मात्र रविवारी मालिका प्रदर्शित करण्यासाठी मला ७ लाख ८० हजार रुपये द्यावे लागत होते. ही रक्कम त्याकाळात माझ्यासाठी जास्त होती, माझे नुकसानही होऊ लागले होते. तरीदेखील बरेच दिवस मालिका चालू होती. परंतु शेवटी मला इच्छा नसतांना ओढवलेल्या परिस्थितीपायी मला मालिका बंद करावी लागली.” अशाप्रकारे त्या काळातील चिमुकल्यांची लाडकी मालिका ‘शक्तीमान’ कायमची बंद झाली.