
प्राईम नेटवर्क : ‘सौंदर्याची राणी’ म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची अभिनेत्री मधुबाला हिची आज ८६ वी जयंती. गुगलनं आजच्या दिवसाची विशेष आठवण म्हणून एक खास डुडल बनवलं आहे. १४ फेब्रुवारी १९३३ रोजी जन्मलेल्या मधुबालाचं मूळचं नाव मुमताज बेगम जहाँ देहलवी असं होतं.
मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये जरी ती वाढली असली तरी तिने आपल्या कुटुंबास बालकलाकार म्हणून सहारा दिला आणि लवकरच ती स्क्रीनवर तिची सुंदरता आणि अतुलनीय अभिनय क्षमता म्हणून ओळखली जाणारी आघाडीची अभिनेत्री बनली.
मधुबाला वयाच्या ९व्या वर्षी बालकलाकार रूपात “बसंत” मध्ये दिसली. १९४७ मध्ये ‘नीलकमल’ या चित्रपटात मधुबाला मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना दिसली होती. या चित्रपटानंतर मधुबालाला ‘सौंदर्याची राणी’ या नावानं ओळखलं जावू लागलं. कुटुंबातील मुख्य कमावती म्हणून तिने तिच्या पालकांना आणि दहा भावाबहिणींना पाठिंबा देण्यासाठी अथक परिश्रम केले. लहान वयात चित्रपटात काम सुरू केल्यामुळे ती शिक्षणापासून वंचित राहिली. १९४९ दरम्यान मधुबाला नऊ चित्रपटांत दिसली.
तिचे मनमोहक सौंदर्य, विनोदी बुद्धी, रोमॅंटिक अदा हे तिचे गुण तिच्या भूमिकांसाठी उपयुक्त ठरले . मुगल-ए-आझम हा तिचा ऐतिहासिक चित्रपट बॉलीवूड इतिहासातील सर्वात लोकप्रिय आणि महाग चित्रपटांपैकी एक ठरला. तिची त्यातील “अनारकली”ची भूमिका अविश्वसनीय आणि अविस्मरणीय होती.
आजच्या दिवशी गुगलनं एक खास डुडल बनवून मधुबालाला आगळ्यावेगळ्या पद्धतीनं आदरांजली वाहिली आहे. गुगलने मधुबालाचे नृत्य करीत असलेलं मुगल-ए-आझम मधील अनारकलीच खास डुडल बनवलंय. बेंगलोरचा मोहम्मद साजिद या कलाकाराने हे डुडल बनवलं आहे.
मधुबालानं केवळ चित्रपटसृष्टीवर राज्य केलं नाही तर तिनं अनेकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणताच सर्वात आधी मधुबालाचं नाव समोर येतं. लाखो दिलांची धडकन म्हणून ती आजही ओळखली जातेय. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी २३ फेब्रुवारी १९६९ रोजी मधुबालाचं निधन झालं. पण तिने ७०हून अधिक चित्रपटात काम केले. मधुबालाला हृदयाचा त्रास होता. अनेकदा चित्रपटाच्या सेटवर तिची प्रकृती बिघडायची. उपचारासाठी ती लंडनला गेली. परंतु, सर्जरी करण्यास डॉक्टरांनी नकार दिला. शस्त्रक्रिया करताना तिचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती डॉक्टरांना वाटत होती. मधुबालाच्या निधनानंतर दोन वर्षानंतर तिचा १९७१ साली ‘जलवा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.