
अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने दिल्लीत JNU च्या विद्यार्थ्यांची भेट घेतली व आपला पाठिंबा नोंदवला. मात्र अनेकांनी याला दीपिकाच्या आगामी चित्रपट छपाकच्या प्रमोशनसाठी केलेला स्टंट म्हणत तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात यावा अशी कोर्टात मागणी केली. त्याचबरोबर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असून चाहते बुक केलेली सिनेमाची तिकिट कॅन्सल करून विरोध नोंदवत आहेत. दरम्यान जनतेच्या या वागणुकीवर राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी निराशा व्यक्त केली.
“छपाक सारख्या चित्रपटावर बहिष्कार टाकणे हे दुर्दैवी” असं म्हणत त्यांनी दीपिकाची पाठ राखली. ९ जानेवारी रोजी अमरावती मध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली या दरम्यान कोल्हे त्यांनी सदर प्रकारावर हळहळ व्यक्त केली. “अभिनेत्री दीपिका पादुकोणने जी काही भूमिका घेतली ती केवळ कलाकार म्हणून घेतली की एक माणूस म्हणून हे जर आपल्याला कळत नसेल तर या पुढे कुठलाही कलाकार बोलण्यास राजी होणार नाही” असं म्हणत अमोल कोल्हे यांनी निंदा व्यक्त केली.