मराठी मालिकांमध्ये असलेल्या सर्व अभिनेत्री ब्राम्हणच का? असा प्रश्न विचारत राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाके याने खळबळ उडवली आहे. मात्र मराठी मालिकांमध्ये ब्राह्मणेतर अभिनेत्रीही तेवढ्याच सहभागी होत असल्याचं सांगत मराठी मनोरंजन विश्वातून सुजयच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे.
मराठी सिरिअल्स जातिवादीच नाही तर वर्णवादी सुद्धा असल्याचा आरोप त्याने केला. ‘एका मालिकेत गोऱ्या अभिनेत्रीला काळी करुन दाखवण्यात आले त्याऐवजी काळी अभिनेत्रीच का नाही घेतली गेली? महाराष्ट्रात गोरेपणाची हौस आहे. विवाह मंडळात सुद्धा नवरी मुलगी गोरीच हवी अशी टीप देण्यात येते.’ सुजयच्या या वक्तव्याचा मालिकाविश्वातून तीव्र निषेध व्यक्त केला जात असून ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने फेसबुकवरून सुजयला टोला लगावला आहे. ‘मी ब्राह्मण नाही, सीकेपी आहे. माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?’ असा तिरका सवाल तिने विचारला आहे.
