Home मनोरंजन गोव्यात या वीकेन्डला सनबर्न ईडीएम फेस्टिवल; हजारो पर्यटक येणार.

गोव्यात या वीकेन्डला सनबर्न ईडीएम फेस्टिवल; हजारो पर्यटक येणार.

0

प्राईम नेटवर्क :गोव्यामध्ये येत्या शनिवार व रविवारी सनर्बन क्लासिक हा इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव (ईडीएम) होणार आहे. त्यानिमित्ताने हजारो पर्यटक उत्तर गोव्याच्या किनारपट्टीतील वागातोर या भागात एकत्र येतील. अशा महोत्सवात अखंडीतपणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पर्यटकांकडून नृत्य केले जाते. बरेच स्थानिकही अशा महोत्सवात सहभागी  होतात.

गेली दोन वर्षे सनबर्न महोत्सव गोव्याऐवजी पुण्यात झाला होता. कळंगुट- कांदोळीच्या पट्टय़ात अगोदर ईडीएम होत होते. यंदा सनबर्न क्लासिक या नावाखाली हा इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सव होत आहे. यापूर्वी गोव्यात काही कंपन्यांनी केलेल्या ईडीएममध्ये अंमली पदार्थाचाही वापर झाला होता. बंगळुरुच्या एका पर्यटकाचा अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे मृत्यूही झाला होता. तथापि, सनबर्न क्लासिक ईडीएममध्ये ड्रग्जचा वापर होणार नाही याची काळजी पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून घेतली जाईल अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

डिसेंबर महिन्यात दोन ईडीएम पूर्वी होत असे,पण किनारपट्टीत यामुळे वाहतुकीची कोंडी होत असे. तसेच पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेवरही मोठा ताण येत असे. त्यामुळे पोलिसांनी एकाचवेळी दोन ईडीएमला परवानगी दिली जाऊ नये तसेच डिसेंबर महिन्यात तर ईडीएम नकोच असे मत व्यक्त केले होते. यावेळी डिसेंबर महिन्यात सरकारने ईडीएमला परवानगी दिली नाही.

यंदा वागातोरला ईडीएम होत असल्याने यावेळचा ईडीएम हा छोट्या स्वरुपात असल्याने वाहतूक व्यवस्था हाताळणे पोलिसांना थोडे सोपे जाऊ शकते. सनबर्न क्लासिक या नावाने गोव्यात प्रथमच ईडीएम होत आहे,पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी याचा फायदा होईल. असे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी समर्थन केले आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता सनबर्न क्लासिक ईडीएमला सुरूवात होईल. जर्मन, डच, कॅनडा आदी ठिकाणचे डीजे आणि इलेक्ट्रॉनिक म्युझिक क्षेत्रातील मान्यवर यावेळच्या महोत्सवात सहभागी होणार आहेत. आनंद,मजामस्तीसाठी स्वत:ला तयार करा. जगभरातील चाहत्यांना जागतिक क्लास डीजे, एक आश्चर्यकारक टप्पा आणि उत्साही एसएफएक्सचा आनंद घेता येणार आहे.