Home मनोरंजन कोहिनुर प्रकरणी राज ठाकरेंना भंडावून सोडणारी ईडी नक्की आहे तरी काय ?...

कोहिनुर प्रकरणी राज ठाकरेंना भंडावून सोडणारी ईडी नक्की आहे तरी काय ? काय आणि कसं काम करते ?

0

प्राईम नेटवर्क : सध्या सगळीकडे एकच बातमी सातत्याने पाहायला मिळत आहे. ती म्हणजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस दिली आहे आणि येत्या २२ ऑगस्टला त्यांना चौकशीला हजर राहण्याचा आदेश ईडीने दिला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ईडीची भीती दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांवर दबाव टाकण्यात येत आहे असं सांगिलंत होतं. सांगायचा हेतू हाच की ईडी (ED) हा शब्द आपल्या कानांना आणि डोळ्यांना काही नवीन नाही. बातम्यांमध्ये, वर्तमानपत्र, न्यूज चॅनल व इतर विविध माध्यमांमधून बऱ्याचदा ईडीचा उल्लेख झालेला दिसतो. मात्र तुम्हाला माहित आहे का ईडी म्हणजे नक्की काय आणि ही संस्था काय काम करते? जर नाही तर चिंता करू नका, आज आपण ‘ईडी’ संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत.

ईडी ! म्हणजेच Enforcement Directorate अर्थात अंमलबजावणी संचालनालय. भारतातातील आर्थिक गुन्ह्यांना आळा घालणारी ही एक संस्था आहे. देशाच्या आर्थिक कायद्याच्या व्यवस्थापनासाठी अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागाने १९४७ च्या कायद्याअंतर्गत १ मे १९५६ रोजी या संस्थेची स्थापना केली. मात्र स्थापना केली तेव्हा ते ईडी नसून ‘ईयू’ (EU) म्हणजेच एनफोर्समेंट यूनिट होते. पुढे १९५७ ला या संस्थेचं नाव ईडी(ED) अर्थात एनफोर्समेंट डायरेक्टरेट असं करण्यात आलं. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ईडी ही एक अशी इकोनॉमिक्स इंटेलिजन्स एजन्सी आहे जी हवाला, मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार यांसारख्या भारतीय गफलतींवर नजर ठेऊन असते.

मुंबई, चेन्नई, चंदीगढ आणि कोलकाता येथे ईडीची विभागीय कार्यालये आहेत. येथून विशेष संचालक कार्यरत असतात. त्याचबरोबर अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगढ, चेन्नई, कोच्ची, दिल्ली, पणजी, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जालंधर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, पटना आणि श्रीनगर या शहरांत ईडीची क्षेत्रीय कार्यालय आहेत. याठिकाणी संयुक्त संचालक काम पाहतात. तसेच भुवनेश्वर, कोझिकोडे, इंदोर, मदुराई, नागपूर, इलाहाबाद, रायपूर, देहरादून, रांची, सुरत, शिमला, विशाखापट्टणम आणि जम्मू येथे ईडीची उपक्षेत्रीय कार्यालये आहेत. येथे उपसंचालक कार्यरत असतात. तर दिल्लीत या सर्व संस्थेचं मुख्यालय कार्यरत आहे.

 

ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय दोन कायद्यांसाठी कार्यरत आहे:

▪ १ जून २००० ला लागू झालेल्या विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम १९९९ या कायद्यानुसार दिवाणी प्रकरणं याअंतर्गत येतात. या प्रकरणांतील सर्व चौकशी ईडीमधील संबंधित अधिकारी करतात. पुढील तपासणीत जर सदर गुन्हा सिद्ध झाला तर आरोपीला थकीत रकमेच्या तीन पट दंड आकाराला जाऊ शकतो.

▪ पीएमएलए हा एक फौजदारी गुन्ह्याबाबतचा कायदा आहे. या कायद्याअंतर्गत इतर गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करण्यात येतो तसेच पीएमएलएतील २८ कायद्यांच्या १५६ कलमांनुसार संपत्ती जप्त करणे, हस्तांतरण, रुपांतरण आणि विक्री यांच्यावर बंदी घालणे या व इतर कारवाया केल्या जाऊ शकतात.

विजय माल्ल्याने भारतात केलेला आर्थिक घोटाळा तुम्हाला माहित असेलच. या केसची सर्व चौकशी ईडीचे अधिकारी करीत आहेत. याचबरोबर नीरव मोदी कर्ज प्रकरण, पी चिदंबरम भ्रष्टाचार प्रकरण, रॉबर्ट वाड्रा बेहिशोबी मालमत्ता प्रकरण अशा कित्येक महत्वाच्या केसेसवर सध्या ईडी काम करीत आहे.

मित्रांनो आता तुम्हाला सविस्तर लक्षात आलंच असेल की ईडी म्हणजे नक्की काय आणि ही संस्था काय काम करते. याच संस्थेने राज ठाकरेंना नोटीस देऊन चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आता तुम्हाला वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनलवर ईडी(ED) या शब्दाचा उल्लेख झाल्यावर म्हणजे काय असा प्रश्न नक्कीच पडणार नाही.

हे सुद्धा वाचा :