पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये तब्बल ११ दिवस बँका बंद राहणार आहेत असे आरबीआयने जाहीर केले आहे. गांधी जयंती, राम नवमी, दसरा, दिवाळी यासारख्या सार्वजनिक सुट्टया एकाच महिन्यात आल्याने सर्व मिळून ११ दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. या ११ दिवसांत दुसऱ्या व चौथ्या शनिवारचा तसेच रविवारचाही समावेश आहे. यावरून ऑक्टोबरचे फक्त २० दिवस बँकांचे व्यवहार चालू असणार आहेत असे समजते. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना वेळेचे नियोजन करून सर्व कामकाज लवकर उरकावे लागणार आहेत.
ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सलग तीन दिवस तर चौथ्या आठवड्यात सलग ४ दिवस सुट्टया असणार आहेत. त्यामुळे जनतेचे दैनंदिन व्यवहार विस्कळीत होण्याची संभावना आहे. तसेच एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या बँकांचे व्यवहार लवकर उरकून घ्यावे अथवा पुढील नियोजन करून ठेवावे असे आवाहन आरबीआयने केले आहे.