
सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या दीड वर्षात सोन्याच्या दरात प्रचंड मोठी वाढ झाली असतानाच आता येत्या काळात सोन्याच्या किमतीत तब्बल ७६ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज विश्लेषकांनी वर्तवला आहे. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज (BofA Sec)च्या संस्थेच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २०२१च्या अखेरपर्यंत सोन्याच्या किमतीत ३,००० डॉलर प्रति औंस इतकी वाढ होऊ शकते. यासोबतच ब्रोकरेजने सुद्धा आपल्या टार्गेट प्राईसमध्ये मोठी वाढ केली आहे.
रुपयाच्या तुलनेमध्ये ३,००० डॉलर प्रति औंस म्हणजेच प्रति १० ग्रॅम ८२,००० रुपये होतात. आगामी १८ महिन्यांच्या कालावधीत सोन्याच्या किमतीत ७६ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.गुरुवारी एमसीएक्सवरील जुन महिन्यातील दर ४६,३५२ प्रति १० ग्रॅम इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोन्याचा स्तर हा १,७५० डॉलर इतका आहे.
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगातिल अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार हे सुरक्षित गुंतवणूक करु इच्छित आहेत आणि सोन्यात केलेली गुंतवणूक एक सुरक्षित गुंतवणूक असल्याचं तज्ञांचं मत आहे.
सध्याच्या काळात सोन्याच्या दरात तेजी पहायला मिळत आहे. तर कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्था चिंतेची निर्माण झाली आहे. तसेच येत्या काळातही याचा परिणाम जाणवणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊन यांचा थेट परिणाम बाजारावर होत आहे. अशा परिस्थितीत सोन्यात केलेली गुंतवणूक ही सुरक्षित ठरणार आहे.
वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या अहवालानुसार, २०२०च्या पहिल्या तिमाहीत सोन्याच्या एक्सचेंज ट्रेजेज फंडने (ईटीएफ) जवलजवळ २३ अब्ज डॉलर्स किमतीची २९८ टन सोनं त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत. ही आकडेवारी २०१६ नंतरच्या तिमाहीतीमधील निर्यातीत सर्वात जास्त आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याचा दर ४५,७२० रुपये प्रति १० ग्रॅम इतका पोहोचला होता. बाजारातील तज्ञांच्या मते सोन्याचा दर या आठवड्यात ४६,००० रुपयांचा टप्पा ओलांडेल तर जून महिन्यापर्यंत हा दर ५०,००० रुपये प्रति १० ग्रॅम होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.