Home अर्थजगत दोन हजारांच्या नोटा बंद होणार का? आरबीआयने दिले स्पष्टीकरण…

दोन हजारांच्या नोटा बंद होणार का? आरबीआयने दिले स्पष्टीकरण…

0

गेल्या काही दिवसांपासून एसबीआय एटीएममधील दोन हजारांच्या नोटांचे स्लॉट्स काढण्यात येणार आहेत तसेच आरबीआयद्वारे दोन हजारांची नोट चलनातून रद्द होणार आहे अशा बातम्या प्रसारित होत होत्या. त्यामुळे देशभरातील लोक चिंतेत होते. या सर्व बातम्यांना पूर्णविराम देत अशा प्रकारचे कोणतेही आदेश बँकेने दिले नसल्याचे आरबीआय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले तसेच लोकांनी याबाबत चिंता करू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असेही सांगितले. दोन हजाराची नोट बंद होणार नसल्याचे कळल्याने देशवासियांना दिलासा मिळाला आहे.

भारतात सणासुदीचे दिवस चालू असले की सगळीकडे रोख रकमेची टंचाई निर्माण व्हायला लागते हे आपणही अनुभवतो. सद्ध्या अशाच सणासुदीच्या वातावरणात भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयच्या एटीएममधून दोन हजारांच्या नोटांचे स्लॉट्स रद्द करून त्याजागी १००, २००, ५०० या नोटांचे स्लॉट्स वाढवण्याचे आदेश आरबीआयने दिले असल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यामुळे दोन हजारांची नोट बंद होणार की काय अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र आरबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे सर्व साफ चुकीचे असल्याचे मीडियाला सांगितले. आरबीआयने कुठलेही आदेश दिले असले तर त्याची माहिती आरबीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. मात्र असे कुठलेही आदेश आरबीआयने दिले नसून दोन हजारांच्या नोटा कायम चलनात राहतील असे त्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.