
पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले असून पुढील सहा महिने पीएमसीचे सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पीएमसीचे खातेदार गोंधळले आहेत. अशातच पीएमसीप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका सुद्धा कायमच्या बंद करण्यात येणार असल्याच्या बातम्या मेसेजद्वारे सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. मात्र या बातम्या साफ खोट्या असून अफवा आहेत आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार नाहीत असे स्पष्टीकरण आरबीआयने दिले.
‘आयडीबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, युको बँक, इंडियन ओवरसिज बँक, देना बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया या नऊ बँका आरबीआयकडून कायमच्या बंद करण्यात येणार असून या बँकांशी संबंधित खातेदारांनी लवकरात लवकर पैसे काढून घ्यावे,’ असे व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले होते.
अर्थ सचिव राजीव कुमार यांनी ट्विट द्वारे या मेसेजमधील बातमी एक अफवा असल्याचे सांगितले. ‘सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होण्याबाबतचा मेसेज चुकीचा असून आरबीआय तसेच सरकार या बँकांना बळकटी देण्याचे काम करते. त्यामुळे या बँका बंद करण्याचा प्रश्नच येत नाही’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले. त्यामुळे या अफवांना आळा बसेल अशी शक्यता आहे.