
मुंबईमध्ये कोरोनाचा थैमान सुरूच आहे, कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४५८ वर पोहोचली असताना एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई सेंट्रल येथे असलेल्या वॉकहार्ट हॉस्पिटल सील करण्यात आलं आहे. वॉकहार्ट हॉस्पिटलमधील २६ नर्स आणि ३ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेतर्फे ‘वॉकहॉर्ट हॉस्पिटल’ आणि आजूबाजूचा परिसर हा कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करत असणाऱ्या नर्सच्या वैयक्तिक सुरक्षेची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली नसल्यानं हॉस्पिलमधील दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा आरोप नर्सच्या नातेवाईकांनी केला होता.
या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या २६ नर्स आणि ३ डॉक्टरांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या रुग्णालयातून आतून बाहेर जाण्यास तसेच बाहेरुन रुग्णालयात जाण्यास सम्पूर्ण मनाई करण्यात येत आहे. जोपर्यंत या हॉस्पिटलमधील सर्व रुग्णांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत हा परिसर कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाइन करून हॉस्पिटल सुदधा बंद केलं आहे.
हॉस्पिटलमधील ओपीडी आणि इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या आहेत. संसर्ग वाढल्यापासून या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना प्रकृती स्थिरावल्यानंतर घरी पाठवण्यात आले होते. या हॉस्पिटलमधील २७० नर्से आणि काही रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. ज्या नर्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले आहे.