नुकताच १ ऑक्टोबर रोजी जागतिक कॉफी डे सेलिब्रेट करण्यात आला. चहा कॉफी म्हटलं की आपल्या सर्वांचाच जीव की प्राण. आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवातच मुळात चहा किंवा कॉफीने होते. आणि जो दिवस कॉफीने सुरु होतो तो अगदी आनंदात आणि उत्साहात जातो. झोप घालवण्यासाठी असो अथवा, ऑफिसच्या कामाची मरगळ पळवून लावण्यासाठी, सर्वात आधी आठवते ती कॉफी जी आपली स्फुर्ती पुन्हा मिळवून देते. पण तुम्ही विचार केलाय का, या स्फुर्तीदायी कॉफीचा शोध कधी व कसा लागला असेल. नाही ? तर काळजी करू नका, कॉफीच्या जन्माची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगू.
तुम्हाला ठाऊकच असेल कॉफी ही ‘कॉफी’ या झाडाच्या फळाच्या बियांपासून बनते ज्याला बेरीज देखील म्हणतात. या फळाला सर्व प्रथम शोधून काढलं एका मेंढपालाने. त्याचं झालं असं की एक काल्डी नामक मेंढपाळ होता. त्याला एक दिवस असे लक्षात आले की त्याच्या बकर्या व मेंढ्या एका ठराविक झाडाच्या बेरीज खाऊन इतक्या प्रफुल्लित होतात की त्या रात्रीच्या झोपतही नाहीत. एक दिवस सहज म्हणून काल्डीने स्वतः त्या बेरीज खाल्ल्या आणि काय चमत्कार, तो स्वतःही प्रफुल्लित झाला. तेवढ्यात तिथे एक भिख्खू आला. काल्डिला आनंदाने नाचतांना पाहून तो म्हणाला, “का रे बाबा का तू एवढा खुश?” तेव्हा त्याला काल्डिने बेरीजची जादू दाखवली. त्या भिख्खूने देखील त्या बेरीज चाखल्या आणि पूड करून पेय बनवून प्राशन केले, आणि त्यालाही असे जाणवले की या पेयाने त्याला बराच वेळ जाग येते आणि झोप कुठल्या कुठे पळून जाते. आणि अशा प्रकारे इथिओपिआमध्ये कॉफीचा जन्म झाला. कॉफीच्या औषधी गुणधर्मामुळे इथिओपिआमध्ये त्याकाळी कॉफीची पाने पाण्यात उकळवून मिश्रण तयार केले जाई, त्याचं आवडीने प्राशन केले जाई. कालांतराने कॉफीची प्रसिद्धी हळू-हळू अनेक ठिकाणी पोहोचली. मात्र कॉफी जगभरात गेली ती अरब लोकांमुळे कारण पंधराव्या शतकात अरब लोकांनी कॉफीचा व्यापाराला सुरूवात केली.. केलेलाच व्यापाराचा नाही तर त्यांनीच कॉफीला जगभरात प्रसिद्धी मिळून दिली असं म्हणायला हरकत नाही.
तसं पाहायला गेलं तर कॉफीचा इतिहास फार मोठा आहे पण ही होती कॉफीच्या जन्माची छोटीशी गोष्ट, आमच्या कॉफीप्रेमी वाचकांसाठी.