
जगभरात थैमान मांडून ठेवलेल्या कोरोना व्हायरसचे नाव आता कोणालाही नवीन नाही. वणव्याप्रमाणे पसरत असणाऱ्या या व्हायरसची जगभरात २ लाखांहून अधिक लोकांना लागण झाली असून आजवर जवळपास १०,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील जवळपास ८८,४०० लोक बरेही झाले आहेत. तसेच महाराष्ट्रात आतापर्यंत या विषाणूची लागण झालेल्या ७४ केसेस आढळून आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा फैलाव कमी व्हावा म्हणून रविवारी सकाळी ७ वाजे पासून रात्री ९ वाजेपर्यंत ‘जनता कर्फ्यु’ची घोषणा केली आहे. या विषाणूला रोखण्याचा खात्रीशीर उपाय अद्याप सापडला नसल्याने जगभरातील सर्व लोकांना घरातून बाहेर न पडण्याचे तसेच जास्त लोकांच्या संपर्कात न येण्याचे आव्हान WHO अर्थात जागतिक आरोग्य संस्थेने केले आहे. या विषाणूची लागण कशी होते व ती रोखण्यासाठी कुठल्या उपाययोजना कराव्यात हे आपण रोज विविध प्रसार माध्यमांद्वारे ऐकत आहोतच. पण हा विषाणू शरीरात गेल्यानंतर नेमके काय होते ते आपण आज जाणून घेणार आहोत.

वैज्ञानिकांच्या मते कोरोना व्हायरस जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा तो शरीरात एका आजाराची निर्मिती करतो. या आजाराला वैज्ञानिकांनी (COVID-19) कोविड-19 असे नाव दिले आहे. या विषाणूचा जगभर झपाट्याने होत असलेला फैलाव पाहता WHO ने कोविड-19 या आजाराला पँडेमिक अर्थात महामारी असल्याचे घोषित केले आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणू जेव्हा श्वासाद्वारे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात पोहोचतो तेव्हा सुरुवातीला अगदी किरकोळ लक्षणे दिसून येतात. परंतु हळूहळू हा विषाणू शरीरात आपले भयंकर रूप धारण करायला लागतो. जेव्हा हा विषाणू शरीरावर अटॅक करतो तेव्हा सुरुवातीच्या काळाला ‘इन्क्युबेशन पिरेड’ असे म्हटले जाते.

इन्क्युबेशन पिरेड म्हणजे इन्फेक्शन झाल्यापासून लक्षणे दिसायला लागण्याच्या दरम्यानचा काळ. शरीरात गेल्यानंतर प्रथम हा व्हायरस व्यक्तीच्या घशातील पेशींवर हल्ला करतो. त्यानंतर श्वसणनलिकेद्वारे फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतो. या अवस्थेत आल्यानंतर व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागतो. फुफ्फुसांमध्ये गेल्यानंतर हा व्हायरस हळूहळू आपली संख्या वाढवायला लागतो व इतर पेशींवरही हल्ला करायला लागतो. या टप्प्यात व्यक्तीला आपण आजारी असल्यासारखे वाटायला लागते. व्हायरसचा प्रभाव शरीरात वाढू लागल्यावर ताप येणे, घशात खवखव जाणवणे, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात. कोरोनामुळे येणारा खोकला सहसा कोरडा खोकला असतो. अशा स्थितीत व्यक्तीची रोग प्रतिकारक शक्ती व्हायरसला रोखण्याचा प्रयत्न करते. व्हायरसला संपवण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार प्रणाली cytokine (सायटोकाइन) नावाचे एक केमिकल तयार करते. यामुळेच व्यक्तीला ताप यायला लागतो आणि अंग दुखायला लागते.

लागण झालेली व्यक्ती जवळपास एक आठवडा या अवस्थेत राहू शकतो. ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती सक्षम आहे ती व्यक्ती एका आठवड्यातच यातून बाहेर निघून बरी व्हायला लागते. परंतु रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व वयोवृद्ध व्यक्तींचे आरोग्य आणखी बिघडायला लागते आणि कोविड-19 ची गंभीर लक्षणे दिसायला लागतात. जेव्हा या व्हायरसचा शरीरावर गंभीर परिणाम व्हायला लागतो तेव्हा याचा प्रभाव किडणीवर पडायला सुरुवात होते. किडनी शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण करण्याचे काम करते.
परंतु शरीर गंभीर अवस्थेत आल्यानंतर किडनीचे कार्य विस्कळीत होते. याचा प्रभाव शरीरातील आतड्यांवरही व्हायला लागतो. त्यामुळे शरीराच्या काही भागांवर सूज यायला लागते व काही अवयव निकामी होण्याची शक्यता असते ज्यामुळे व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो. जागतिक आरोग्य संस्थेच्या संशोधनानुसार या व्हायरसचा गंभीर प्रभाव सहसा ५० वर्ष व त्याहून अधिक वयोगटातील लोकांवर होतांना आढळून येत आहे. तरीही सर्वच वयोगटातील लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. जगावरील आलेल्या या संकटाचा सर्वांनी मिळून सामना करायला हवा.
वाचण्या सारखे अजून काही
रोगप्रतिकारक शक्ती वाढवा आहारात करा या फळांचा आणि मसाल्यांचा वापर, आणि कोरोनाला ठेवा दूर