Home माहितीपूर्ण भारताची पहिली महिला कोबरा कमांडो, जीने नक्षल्यांना पळता भुई थोडी केलीये !

भारताची पहिली महिला कोबरा कमांडो, जीने नक्षल्यांना पळता भुई थोडी केलीये !

0
usha kiran crpf

प्राईम नेटवर्क : छत्तीसगड म्हटलं की आठवतात आदिवासी लोक, जंगलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नक्षलवादी एरिया. कायम वर्तमानपत्र आणि न्यूज मधून आपण नक्षलवादी हल्ल्यांच्या बातम्या पाहत असतो. हे निर्दयी लोक सामान्य नागरिकांपासून पोलीसांपर्यंत कुणालाही कशाचाही विचार न करता गोळ्या घालतात. म्हणूनच या भागात जाण्यासाठी भल्याभल्यांची हिंमत होत नाही.

छत्तीसगड ट्रान्सफर म्हणजे जीवन मरणाचा खेळ हे पोलिसांनी आता ठरवूनच ठेवलंय. अशा भीतीदायक वातावरणात मात्र एक महिला निडरपणे फिरते. या भागाची तिला जराही भीती वाटत नाही आणि ही महिला कुणी सामान्य महिला नसून कोबरा कमांडो फोर्सची पहिली महिला कमांडो आहे. तिचं नाव आहे उषा किरण! २७ वर्षांच्या उषा किरणने स्वतःहून या भागात ड्युटी मागून घेतली आहे आणि मोठ्या हिमतीने ती तिची कामगिरी बजावत आहे.

उषा किरण गुरुग्रामची राहणारी आहे. तिचे वडील व आजोबा सीआरपीएफ होते. त्यामुळे देश सेवेची आवड तिच्या रक्तातच होती. लहानपणीपासूनच तिचंही हेच स्वप्न होत. २०१३ मध्ये सीआरपीएफच्या परीक्षेत तिने २९५ वा रँक मिळवला. सीआरपीएफचं अतिशय कठीण असं ट्रेनिंग तिने जिद्दीने पूर्ण केलं. तेव्हा ती केवळ २५ वर्षांची होती. ट्रिपल जंप मध्ये राष्ट्रीय स्तरावरील विजेता असलेल्या उषाने ट्रेनिंगनंतर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकच विनंती केली की मला भारतातील जम्मू-कश्मीर, उत्तर-पूर्वीय राज्य किंवा नक्षलवादी विभागासारख्या अतिशय अवघड आणि घातक ठिकाणी काम करण्याची इच्छा आहे.

उषाची हिंमत आणि जिद्द पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिला छत्तीसगडच्या बस्तरमधील दरभा घाटीत कामगिरीसाठी नियुक्त केलं. २५ मे २०१३ रोजी याच ठिकाणी काँग्रेसचे काही नेते आणि इतर ३२ लोक मारले गेले होते. आता तुम्हाला वेगळं सांगायला नको की छत्तीसगड मध्ये कायम कसे भयानक प्रकार घडत असतात.

वर्षाच्या सुरुवातीलाच उषा सीआरपीएफच्या कोबरा फोर्समध्ये सहभागी होऊन कोबरा फोर्सची सगळ्यात कमी वयाची पहिली महिला ऑफिसर झाली. कोबरा म्हणजेच कमांडो बटालियन फॉर रिजॉल्यूट ऍक्शन! यांच्यासाठी काम करणं म्हणजे तोंडचा खेळ नाही. ही सीआरपीएफची एक विशेष ब्रँच आहे जी गोरिला टेक्निकनुसार काम करते आणि कोबरा फोर्सचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे नक्षलवाद्यांचा नायनाट ! यासाठी त्यांना जीवाची बाजी लावून अहोरात्र प्लॅनिंग करून गस्त घालावे लागतात आणि यासाठी लागते हिंमत आणि चिकाटी जी उषामध्ये भरभरून होती.

उषा स्वतः तर निडरपणे त्या ठिकाणी वावरतेच पण तेथील रहिवासी महिलांच्या मनातून भीती घालवण्याचं कामही ती करीत आहे. जेव्हा उषाला फोर्सचं काम नसतं तेव्हा ती तेथील रहिवासी मुलांची शिकवणी घेते आणि फावल्या वेळात त्या भागातील पोलिसांचीही मदत करते. उषा किरणच्या निस्वार्थ समाजसेवेसाठी २०१८ मध्ये तिला वोग वूमन ऑफ द ईयरच्या वतीने सर्वात कमी वयाची अचिव्हर म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

उषा किरणच्या हिंमत, चिकाटी आणि जिद्दीला दाद द्यायला हवी आणि सोबत तिच्या निस्वार्थ समाज सेवेच्या भावनेला प्राईम मराठीचा सलाम !