Home माहितीपूर्ण रक्षाबंधन आणि त्या मागील भारतीय कथा आणि इतिहास

रक्षाबंधन आणि त्या मागील भारतीय कथा आणि इतिहास

0

प्राईम नेटवर्क : भारतीय संस्कृतीत प्रमुख सणांमध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीच्या स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’ तर पश्चिम भारतात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने हा सण साजरा केला जातो. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला जातो हे वेगळं सांगायलाच नको. ‘रक्षाबंधन’ या सुरेख शब्दाचा एखाद्या वेळेस नकळत मनातल्या मनात अर्थ उकरून काढला तर ‘संरक्षणाचे बंधन’ हे चटकन लक्षात येतं. म्हणजे बहिणीने भावाला राखी बांधावी आणि भावाने आयुष्यभर तिच्या सुखदुःख, संकटं आणि अडचणींमध्ये कायम रक्षणाला बांधील राहावं. भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या मनगटात हत्तीचं बळ यावं म्हणून बहिणीनेही हा रेशमी धागा बांधावा… असं सांगणारा हा सण! रक्षाबंधनाचे पुरावे शिलालेखांपासूम तर ग्रंथांपर्यंत इतिहासाच्या प्रत्येक पानावर पाहायला मिळतात. घरातील थोरल्या मंडळींनी यदाकदाचित तुम्हाला सांगितलंही असेल पण या मागची सविस्तर कथा तुम्हाला माहित आहे का? कसा जन्म झाला या सुंदर उत्सवाचा? या छोट्याश्या रेशमी धाग्याने काय अशी जादू केली की आजतागायत हा सण अगदी जय्यत तयारीनिशी साजरा केला जातो; हे आज आपण जाणून घेणार आहोत.

रक्षाबंधन साजरा करण्यामागे अनेक कारणं आहेत. एकदा देवांचा राजा इंद्र याचा दानवांनी पराजय केला होता. तेव्हा त्यांच्या उजव्या हातावर त्यांची पत्नी इंद्राणीने रक्षासूत्र बांधले होते असे म्हणतात. त्या रक्षासूत्रामुळे इंद्रदेवांचा आत्मविश्वास अगणित वाढला आणि त्याच आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी पुढे दानवांवर विजय मिळवला होता. अशी आपल्याकडे पौराणिक कथा आहे. त्याचबरोबर महाभारतात युद्धादरम्यान श्री कृष्‍णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होतं. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्‍णाच्या बोटाला बांधली होती. तेव्हापासून श्रीकृष्णाने द्रौपदीचे आजन्म रक्षण करण्‍याचा संकल्प केला होता असे म्हटले जाते. भारतीय इतिहास चाळला तर रक्षाबंधनाचे अनेक संदर्भ मिळतील. त्यापैकी चित्तौडगडच्या राणीची कहाणी शाळेत बहुधा तुम्ही ऐकलीही असेल. चित्तौडगडची राणी कर्मावतीने बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायुंला राखी बांधली होती आणि हुमायुंने तिच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली होती. यातून नात्याची शक्ती आणि संरक्षणाचं बंधन कसं जन्माला आलं असेल याची नकळत प्रचिती होते.

या तिन्ही कथांमधून तुम्हाला लक्षात येईल की, केवळ भावाने बहिणीच्या किंवा बहिणीने भावाच्या रक्षणासाठीच हा सण साजरा करावा असं काही नाही तर समाजातील प्रत्येक दुबळ्या, असहाय्य, गरजू व्यक्तीच्या अडचणींमध्ये उभे राहण्याचे बळ या रेशमी धाग्यातून भावा-बहिणीच्या मनगटात येत असते. हा रेशमी धागा बहीण-पत्नी, काळा-गोरा, गरीब -श्रीमंत, लहान-मोठा अगदी जात-धर्म असा कुठलाही भेदभाव करत नाही हे आम्ही नाही तर स्वतः आपला इतिहास सांगतो. या १५ ऑगस्टला रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिन हे एकाच दिवशी येण्याचा योग १९ वर्षांनंतर जुळून आला आहे. या अद्भुत संगम सोहळ्याचे औचित्य साधून आपल्या रक्षणासाठी निस्वार्थ गोळ्या झेलणाऱ्या भारतीय सैनिकांच्या रक्षणाच्या हेतूने आपल्या वतीने त्यांना एक राखी नक्की पाठवा. कारण ते आपल्या प्रमाणे सण-उत्सव साजरा करू शकत नाहीत मात्र आपण पाठवलेला एक रेशमी धागा त्यांना आयुष्यभराचं बळ नाही पण क्षणिक आनंद नक्कीच देऊन जाईल.