
लॉकडाऊनच्या काळात गरिबांना कामधंदा मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली. या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकास प्रति व्यक्ती ५ किलो धान्य वितरित करण्याचे आदेश दिले होते. मात्र काही रेशन दुकानदारांनी याचा फायदा घेऊन तांदळाचा काळाबाजार मांडला असल्याचे प्रकरण समोर आले आहे. टीव्ही 9 मराठीच्या वृत्तानुसार पनवेलचे पोलीस उपायुक्त हेमंत दुधे यांनी या गैरप्रकाराचा पर्दाफाश केला.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार गरिबांना वाटण्यासाठी आणलेला तांदूळ पनवेल जवळील पळस्पे येथे असलेल्या केयर टेकर लॉजीस्टिक्स या गोदामात साठवून ठेवला जात होता अशी माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली. सदर माहिती मिळताच पोलिसांनी या गोदामावर शुक्रवारी रात्री छापा टाकला. त्यातून त्यांना तब्बल ११० टन तांदुळाचा साठा आढळून आला. यासंदर्भातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तांदूळ देखील जप्त केला. त्यात ५० किलो वजनाच्या २२२० गोण्या अर्थात ३३ लाख ८ हजार रुपये किमतीचा तांदूळ जप्त करण्यात आला. याशिवाय लोकमतच्या वृत्तानुसार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून रेशनच्या तांदुळाचे ४ कंटेनर्स अवैध मार्गाने पनवेलला पोहचल्याचे पोलिसांना समजले. तेथे ३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.