Home महाराष्ट्र आशिष शेलारांचे शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र तर शिवसेनेने लावले शेलारांचे वादग्रस्त होर्डिंग

आशिष शेलारांचे शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र तर शिवसेनेने लावले शेलारांचे वादग्रस्त होर्डिंग

0

२०२०-२१ वर्षाचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प काल अर्थात मंगळवारी सादर झाला. मुंबई महानगरपालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता आहे. नुकत्याच आलेल्या एका मीडिया रिपोर्टनुसार भाजप नेते आशिष शेलार यांनी दावा केला की या अर्थसंकल्पातून मागील ५ वर्षांत तब्बल २५,००० झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली. यासंबंधात ट्विट करून त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.  

आशिष शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “मुंबई महापालिकेने गेल्या 5 वर्षात मुंबईतील 25 हजार झाडे तोडण्यास परवानगी दिली, असे आज अर्थसंकल्पात स्वतःच जाहीर केले. त्यावेळी पर्यावरण प्रेम कुठे गेले होते? मग हट्टाने मेट्रोकारशेडचे काम का थांबवले? मुंबईकरांचे 300 कोटीचे नुकसान का केले?”

गेल्या काही दिवसांपासून आशिष शेलार शिवसेनेवर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असल्याने राजकीय वर्तुळात बरेच चर्चेत आहेत. याआधी शिवसेनेच्या सीएएच्या धोरणाबद्दल बोलतांना ननालासोपारा येथील एका सभेत शेलार म्हणाले होते की, “आज मी टीव्हीवर बघितलं की शिवसेनेने सीएएविषयी आपली भूमिका बदलली आहे. सीएए महाराष्ट्रात लागू देणार नाही, तुझ्या बापाचं राज्य आहे का? हा केंद्राचा कायदा आहे. अॅडव्होकेट जनरलचं ओपिनियन घ्या. अभ्यास करता येत नसेल, तर माझ्यासारखे वकील खूप आहेत.” यावर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी निषेध व्यक्त करत एका भाजप नेत्याच्या कार्यालयाबाहेर आशिष शेलार यांच्या व्यंगचित्राचे होर्डिंग लावले. मीडिया रिपोर्टनुसार या होर्डिंगमध्ये शेलार फाटक्या कपड्यांत अर्धनग्न अवस्थेत दिसत आहेत. तसेच या होर्डिंगवर “आ’शिषे’ मे देख” असे वाक्य लिहीण्यात आले आहे.

यावर शिवसेनेचा रोष बघून शेलरांनी आपले विधान सावरले आणि म्हणाले, “माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाला असंवैधानिक वाटत असेल, त्रास झाला असेल, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला, माफी मागायला माझी काहीही अडचण नाही. पण माझा रोख हा शिवसेनेसाठी नव्हता. कारण उद्धव ठाकरेंनी त्यांची सीएएविषयीची भूमिकाच अजून जाहीर केलेली नाही. माझ्या टीकेचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दिशेने होता.”