Home महाराष्ट्र आळंदीच्या महाराजांची विद्यार्थ्यास बेदम मारहाण; विद्यार्थी कोमात!

आळंदीच्या महाराजांची विद्यार्थ्यास बेदम मारहाण; विद्यार्थी कोमात!

0

अध्यात्माचे पाठ देणारे गुरुजी भगवान पोहने आपल्याला एक दिवस मारून मारून कोमात पाठवतील असे ११ वर्षीय ओम चौधरीला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. हरिपाठ आणि नीट अभ्यास करत नसल्याच्या कारणास्तव भगवान पोहने याने चिमुरड्या ओम चौधरीला लाकडी काठीने बेदम बडविले. यात वारंवार छातीवर झालेल्या प्रहराचा धक्का त्याच्या हृदयापर्यंत पोहोचला व तिथे पाणी झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

एबीपी माझाच्या मीडिया रिपोर्टनुसार तब्बल ७ दिवसांपासून हा चिमुरडा कोमामध्ये आहे.
पुण्यातील देवाची आळंदी येथील माऊली ज्ञानराज अध्यात्म शिक्षण संस्थेमध्ये हा सर्व प्रकार १० फेब्रुवारी रोजी घडला. एवढ्या मारहाणीनंतरही ओम त्या कळा सहन करत राहिला आणि तशाच अवस्थेत या महाराजाने त्याला औरंगाबाद येथे कामानिमित्त नेले. पण तिथे ओम बेशुद्ध होऊन पडला. घरच्यांनी ओम बद्दल विचारले असता तो आजारी असल्याची थाप महाराजांनी घरच्यांना मारली आणि ओमला पुणे येथील तळेगाव दाभाडे मध्ये खासगी रुग्णालयात दाखल केले. ओम ची आई त्या रुग्णालयात साफसफाईचे काम करत असल्यामुळे स्वस्त दरात उपचार होतील असे महाराजाला वाटले आणि याच हलगर्जीपणामुळे ओम कोमामध्ये गेला.

या प्रकरणात आळंदी पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा महाराजावर दाखल करण्यात आला आहे. तसेच बेपत्ता महाराजाला शोधण्यासाठी पोलीस दल रवाना झाले आहे. सध्या ओमवर डी वाय पाटील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ओमची परिस्थिती हलाकीची असून त्याला मदतीची गरज आहे.