
महाराष्ट्रातील १८ जिल्हे रेड तर १४ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये असून तीन जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. कोरोनामुळे राज्यातील ४७ लाख तर देशातील सुमारे पाच कोटी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षाचं झालेल्या नाहीत. आता प्रत्येक विद्यापीठांनी त्यांच्या प्रचलित गुणांकन पद्धती अनुसार ऑनलाइन अथवा विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार १ ते ३१ जुलैपर्यंत परीक्षा घेऊन १४ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करावा, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील काही जिल्ह्यांमधून कोरोना अद्यापही हद्दपार झाला नसून लॉकडाउनच्या अंतिम टप्प्यात अनेक जिल्हे रेड झोनमध्ये गेले आहेत. देशातील संपूर्ण लॉकडाउन ३ मेनंतर संपेल, अशी स्थिती सध्यातरी नाही.
दुसरीकडे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर देश पातळीवर एकाच पॅटर्ननुसार परीक्षा घ्यावी की नाही, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणत्या पद्धतीने परीक्षा घ्यायच्या याचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगा मार्फत डॉ. कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती स्थापन केल्या गेली. या समितीने आपला अहवाल आयोगाला सादर केला असून त्याची एक प्रत देशातील सर्व राज्यपालांना (कुलपती) पाठविण्यात आली आहे. आता प्रत्येक राज्याचे राज्यपाल त्यांच्या राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. त्यानुसार कोणत्या विद्यापीठाची परीक्षा पद्धत कशी असणार (ऑनलान), कधीपर्यंत परीक्षा होईल याचा अंदाज घेतला जाणार आहे. सर्व परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घ्याव्यात, विद्यार्थ्यांना बाहुपर्यायी प्रश्न द्यावेत, ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची तथा साधने उपलब्ध नाहीत त्यांची सोय महाविद्यालयांकडून विद्यापीठानी करून घ्यावी, असेही आयोगाने अहवालात स्पष्ट केले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने नियुक्त केलेल्या समितीने परीक्षा कधीपर्यंत घ्यावी, आगामी शैक्षणिक वर्षे केव्हा सुरू होणार सांगितले आहे. त्यानुसार परीक्षांचे नियोजन सुरू आहे. देशातील बहुतांश विद्यापीठाच्या परीक्षा पद्धती वेगवेगळी असल्याने प्रत्येक विद्यापीठांना आता त्यानुसार परीक्षा घेता येईल. त्यासाठी ऑनलाईन माध्यमांचा सर्वाधिक वापर करावा, उर्वरित विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी प्रश्नपत्रिका कशी, कोणत्या माध्यमातून पोहच करायची यासंदर्भात राज्यपाल व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत मार्गदर्शन करतील असे सांगण्यात आले आहे.