
औरंगाबाद येथे लोहमार्गावरील बदनापूर -कर्माड स्टेशन दरम्यान मालगाडीखाली १६ मजुरांचा चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर अपघाताचे संपूर्ण तपासाचे आदेश रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लोको पायलटला काही मजूर हे लोहमार्गावर झोपलेले आढळले, हे मजूर पाहून त्याने ट्रेन थांबवण्याचे अफाट प्रयत्न केले मात्र त्याचे हे प्रयत्न अपयशी ठरले.
परभणी मनमाड सेक्शनच्या बदनापूर आणि करमाड स्थानका दरम्यान अपघात झाला. दरम्यान यामधील जखमींना औरंगाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे उपचार सुरू आहेत अशी माहिती भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे, तर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या प्रकरणात कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आज सकाळी पाच-सव्वापाचच्या सुमारास हा अपघात झाला. जालन्यातील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांनी घरी परतण्यासाठी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. रात्री चालत चालत ते करमाडपर्यंत आल्यानंतर थकल्यामुळे रेल्वे रुळावरच झोपी गेले. आज पहाटे जालनाकडून येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली आल्याने यामधील १६ जणांचा दुर्देवी अंत झाला आहे.